अहमदनगर बातम्या

अतिवृष्टीमुळे यंदाचा रब्बी हंगामातील पेरण्यांचा मुहूर्त लांबणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात मागील आठवडा अखेर 141 टक्के अतिरिक्त पाऊस झालेला असून यामुळे आतापर्यंत रब्बी हंगामाच्या अवघ्या पाच टक्के पेरण्या झालेल्या आहेत. यामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतात पाणी साचून असल्याने तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अजूनही पावसाची शक्यता असून यामुळे रब्बी हंगामासाठी वापसा कधी होणार या चिंतेत शेतकरी आहेत.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, सुर्यफूल, कापूस आणि अन्य पिकांमध्ये पाणी साठलेले असून शेतकर्‍यांना आधी या पिकांची विल्हेवाट लावावी लागणार आहे.

यातून वापसा होण्यास बराचा कालावधी लागणार असल्याने चालू हंगामात रब्बीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता कृषी विभागाला आहे. नगर जिल्हा हा प्रमुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा असून जिल्ह्यात ज्वारी, गहू, आणि हरभारा पिके घेण्यात येतात.

यासह कांदा पिकाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, परतीचा पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी हाहाकार केलेला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वाधिक क्षेत्र असून ते दक्षिण जिल्ह्यातील आहेत.

नेमके दक्षिण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ज्वारी पेरणीसाठी काही काळ वाट पाहवी लागणार आहे. जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र पावणे पाच लाखांच्या जवळपास असून वेळेत वाफसा न झाल्यास ज्वारीच्या पेरण्यांना उशीर होणार आहे.

Ahmednagarlive24 Office