Ahmednagar News : कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून, या आवर्तनात नियोजनाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कर्जत तालुक्यातील करमणवाडी, येसवडी, काळेवाडी, करपडीसह पाच-सहा गावे पाण्यापासून वंचित राहण्याची
तसेच थेरवडी, दुरगाव, चिलवडी व कोपर्डी येथील तलावही रिकामेच राहण्याची भीती होती. आ. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतकरी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुकडीच्या पाणी नियोजनाची बैठक घेतली. बैठकीत आ. पवार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या कुकडीचे सुरू असलेले आवर्तन ३० ऑगस्ट रोजी बंद करण्यात येणार आहे. परंतू असे झाले तर तलावही रिकामेच राहतील आणि अनेक गावेही पाण्यापासून वंचित राहतील, हीच बाब लक्षात घेऊन आ. पवार यांनी शेतकऱ्यांसह बैठक घेतली.
बैठकीत ३० ऑगस्टऐवजी ५ सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना पुरेशा दावाने आणि आवश्यक तेवढे पाणी सोडले जात होते.
परंतु सध्या सत्तेत असलेल्या सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळे अनेक गावे पाण्यापासून वंचित राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. आ. पवार यांनी बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी अधिकाऱ्यांनादेखील बरोबर घेतले.
बैठकीत आ. पवार शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याबाबत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकार बदलल्यानंतर झालेल्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य लोकांना त्याची अडचण होतेय, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये, असे या वेळी आ. पवार यांनी अधिकाऱ्यांना बजावून सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांनीही सर्व भागाला पाणी मिळेपर्यंत पाणी सुरू ठेवण्याचा शब्द दिला.