Ahmednagar News : स्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा शिवारात घडली. दादाभाऊ गोरख वाबळे (वय ३२, रा. पिंपळगाव वाघा) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी ही घटना घडली. जखमी दादाभाऊ वाबळे यांनी रूग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमिनाथ बाजीराव वाबळे (रा. पिंपळगाव वाघा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
दादाभाऊ वाबळे हे सोमिनाथ यांना रस्ता करून देत नव्हते म्हणून सोमिनाथ याने दादाभाऊ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून व काडी लावून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक निरीक्षक गिते अधिक तपास करत आहेत.