सुट्ट्यांमुळे शिर्डीतील साईंचा दरबार भाविकांनी फुलाला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

दरम्यान नवीन वर्ष जवळ येत असल्याने साईंच्या दर्शनासाठी भाविकांना ओघ वाढला आहे. यातच सलग सुट्ट्या आले असल्याने भाविकांची संख्या सातत्याने वाढत असून गर्दीमुळे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे ऑनलाईन बुकींग करूनच साई दर्शनासाठी या, असे आवाहन साईबाबा संस्थानने केलेलं आहे.

सुट्टीच्या दोन दिवसात 30 हजार तर रविवार दुपारपर्यंत 10 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नविन वर्षाचे स्वागत साई दर्शनाने करण्यासाठी भाविकांची 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान साई मंदिरात प्रशासनाकडुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र ऑफलाईन पास काढून दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिराच्या बाह्य परिसरात भाविकांची लांबच रांग दिसत आहे.

आरतीच्या वेळी दर्शन बंद असल्याने त्या काळात गर्दी अधिकच वाढत आहे. मंदिराच्या बाह्य परिसरात रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून उपाययोजना करण्याची नितांत गरज असून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24