मागणी वाढल्याने बाजारात बैलांचे भाव तेजित

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अवघ्या एक महिन्यावर येवुन ठेपलेल्या आगामी खरीप हंगामासाठी शेती मशागतीला बैलांची गरज असल्याने शेतकऱ्यांकडून बैलांची मागणी वाढली असून, त्या प्रमाणात बाजारात बैल येत नसल्याने दुष्काळातही बैलबाजारात चांगलीच तेजी आली आहे.

चाराटंचाई, पाणीटंचाई असली तरी बेलापुरी बैलापेक्षा शेती मशागतीला लागणाऱ्या जनावरांना मागणी वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात बैलांच्या किमती सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

शेती कामातील मुख्य नांगरटीचे कामे झाल्यावर किमती कमी होतात, असा साधारण बाजारातील कल असतो. मात्र, यावर्षी बैल बाजारात उलटे चित्र पाहायला मिळत आहे. पुढील महिन्यात शेतीची कामे पाळी, पेरणी, मोघडणी ही कामे बैल चांगल्या पद्धतीने करतात.

शेतीची कोने कोपरे बैलांच्या साहाय्याने मोकळी करता येतात. जास्त रान लागवडी योग्य होते, त्यामुळे ट्रॅक्टर पेक्षाही बैलांच्या कामाकडे शेतकरी वर्ग वळाल्याने मागणी वाढली असल्याचे खरेदीदार शेतकरी राम धायतडक यांनी सांगितले. मागील महिन्यात जळगाव, संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातील व्यापारी खरेदीसाठी येथील बाजारात आले होते.

मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने बैलबाजारात कधी नव्हे खरेदी-विक्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी पाथर्डीचा बैलबाजार असतो. येथील जनावरांचा बाजार प्रमुख बाजार असल्याने जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून व्यापारी येतात. चाळीसगाव, गंगापूर, लासुर स्टेशन, लासलगाव,

अंबड, संभाजीनगर, पैठण आदी भागातून व्यापारी बैल खरेदी विक्रीसाठी येतात. मागील महिन्यात ६० हजार रुपयांना विकल्या गेलेल्या बैलजोडीची किंमत आजच्या बाजारात ८०००० पर्यंत गेल्याचे कळले. बेलापुरी बैलांना मागणी कमी आहे.

तोडणी हंगामासाठी कामगारांबरोबर ऊस वाहतुकीसाठी जी बैलजोडी वापरली जाते, तिला बेलापुरी बैलजोडी म्हणतात. चाऱ्यासाठीचा उसाचे भाव दुपटीने वाढले आहेत. सध्या साळलेला उस पाच हजार रुपये टन, हिरवा चारा त्यात प्रामुख्याने मक्याची एक पेंढी पंचेचाळीस रुपयांना तर घासाच्या एका जुडीचा भाव दहा ते बारा रुपये आहे.

कडबा पंधराशे रुपये शेकडा, वैरण अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत असून अन्नधान्य व जनावरांच्या चाऱ्याचे भाव जवळजवळ सारखेच होत चालले आहेत. पाथर्डी येथे सध्या भेंडा, कुकाना, सलबतपुर, प्रवरा संगम, या भागातून ऊस विक्रीला येत आहे.

असे बबन नरोटे या शेतकऱ्याने सांगितले. व्यापारी बाबासाहेब सोनटक्के म्हणाले, एका जोडीची किंमत ४० हजारांपासून सव्वा लाख रुपये पर्यंत आहे. आवक कमी व ग्राहक जास्त झाल्याने बाजार भाव वाढले आहेत. शेतात मशागतीची कामे संपल्यावर बाजार भाव खाली येतील असा दरवर्षीचा होरा असतो.

येथील जनावरे कमी किमतीत घेऊन पाणी असलेल्या पश्चिम व उत्तर महाराष्ट्र भागात विक्रीसाठी व्यापारी नेतात. र खरेदीदार विक्रेते वाहतूकदारांमुळे मंगळवार बुधवार परिसरातील आर्थिक उलाढाल वाढते. साखर कारखाने बंद झाल्याने वाढे विक्री बंद झाली असून आता उसाची विक्री वाढल्याने अशीच परिस्थिती राहिली तर यंदा कारखान्यांपुढे ऊस टंचाईचे सुद्धा संकट वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe