अहमदनगर बातम्या

कुकडी प्रकल्पात येणाऱ्या धरणांवर पावसाचा जोर वाढल्याने कुकडीतून २८ हजार क्युसेसने विसर्ग सुरू !

Published by
Ahmednagarlive24 Office

कुकडी प्रकल्पातून २८ हजार क्युसेसने विसर्ग सुरू असल्यामुळे निघोज परिसरातील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर जलमय झाला असून, कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून रविवारी दुपारी साडेसात हजार क्युसेस्कने पाण्याचा विसर्ग झाल्याने जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

गेल्या तीन चार दिवसांपासून कुकडी प्रकल्पातील धरणांवर जोरदार पाऊस सुरू असल्याने कुकडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, अवघ्या तीन दिवसांत कुकडीच्या प्रकल्पात सरासरी पासष्ट टक्के पाणीसाठा झाला आहे. तर कुकडी मधील वडज, डिंबे आणि येडगाव, धरणाच्या सांडव्यातुन शनिवारपासून विसर्ग सोडण्यात आला आहे. रविवारी दुपारी तीन नंतर या तिन्ही धरणांतुन कुकडी नदीपात्रात अठ्ठावीस हजार क्युसेसने विसर्ग सुरू असल्याने कुकडी अंतर्गत येणाऱ्या जुन्नर, पारनेर व शिरुर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील आठवड्यात पाऊस कमी असल्याने कुकडी प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प होता. मात्र, तीन चार दिवसांपासून कुकडी प्रकल्पात येणाऱ्या धरणांवर पावसाचा जोर वाढला आहे. कुकडीच्या डिंबा, येडगाव वडज, पिंपळगाव जोगा व माणिकडोह धरणात पाणीसाठ्‌यात झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता येडगाव धरणातुन एक हजार क्युसेसने सांडव्यातुन विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर वडज व डिंबे धरणातुनही विसर्ग सोडण्यात आला.

रविवारी पाऊस वाढल्याने सध्या डिंबे धरणातुन अठरा हजार क्युसेसने, वडजमधुन पाच हजार क्युसेस तर येडगाव धरणातुन साडेसात हजार क्युसेस, असा अठ्ठावीस हजार क्यूसेसने कुकडी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या कुकडीच्या धरणांमध्ये सरासरी पासष्ट टक्के पाणीसाठा झाला असला तरी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी धरणातील पाणीसाठा समाधानकारक होईल. यामुळे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आदी तालुक्यांत शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण आहे.

कुकडी नदीपात्रात (जुन्नर, पारनेर व शिरूर तालुका) पाणी प्रवाह सुरू होणार असून, तो कोणत्याही क्षणी वाढण्याची शक्यता आहे. आपल्या गावातील तमाम नागरिकांना दवंडीद्वारे किंवा ध्वनी प्रक्षेपकाद्वारे सावधनतेचा इशारा देण्यात यावा. तसेच आपली जनावरे व इतर उपयोगी वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित हानी /वित्तहानी होणार नाही.

प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ नारायणगाव. येडगाव ८२.२४, माणिकडोह ४४.८६, वडज ५६,३७, पिंपळगाव जोगे १५.२४, डिंभे ९४.५९, विसापूर ५३.७१, चिल्हेवाडी ७९.०७, घोड ७४. ३७ कुकडी प्रकल्प ६४.८२ टक्के, अशाप्रकारे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा गेल्या चार दिवसात बऱ्यापैकी वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office