आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे.
अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
शनिवार दि. 24 जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील भातोडे या गावचे वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी या ठिकाणी हृदयविकाराचा अटॅक आला. श्री. पवार यांच्यासोबत असलेले वारकरी शामराव घोलप यांनी “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचीमधून मोबाईल क्रमांक पहात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मध्यरात्री फोन करून घटनेची माहिती देत मदत मागितली.
जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन क्षणाचाही विलंब न करता सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना रात्री २.४६ वाजता दूरध्वनीद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली व वारकरी श्री. पवार यांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्याची सूचना केली.
सोलापूर प्रशासनाने तत्परता दाखवत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत वारकऱ्याला वैद्यकीय सेवा दिली. तत्परतेने व वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्याने श्री. पवार यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले.