Ahmednagar News : कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरात राज्यकर्त्यांना राज्य चालवीत असताना जनतेच्या प्रखर विरोधात सामोरे जावे लागेल, अशा पद्धतीचे भाकीत गुढी पाडव्याच्या दिवशी वाचलेल्या संवत्सरीत निघाले आहे.
कर्जत येथे श्री गोदड महाराज मंदिरात दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी पुजाऱ्या कडून ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांनी स्वहस्ते लिहून ठेवलेल्या संवत्सराचे वाचन केले जाते. या भकीतावर कर्जत व परिसरासह तालुक्यातील जनतेची मोठी श्रध्दा असल्याने अनेक लोक हे भाकीत ऐकण्यास उपस्थित राहतात.
सदर भाकीत दरवर्षी खरे ठरते असा भाविकांचा अंदाज आहे. मंगळवारी दुपारी महाराजांच्या समाधी मंदिरात दुपारी श्री गोदड महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ काकडे यांनी सालाबाद प्रमाणे या वर्षीच्या संवत्सराचे वाचन केले.
शिववाहन शक १९४८ (इ.स. २०२४-२५) या चालू वर्षाच्या संवत्सराचे नाव क्रोधी नाम संवत्सर असे आहे. या संवत्सराचा स्वामी म्हणजेच राजा शुक्र आहे. या संवत्सराच्या नावातच क्रोध हा शब्द आलेला आहे. त्यामुळे राजा व प्रजा या दोघांत रागामुळे कलह (विरोध) माजेल.
त्यामुळे राज्यकर्त्यांना राज्य चालवीत असताना जनतेच्या प्रखर विरोधात सामोरे जावे लागेल. त्यांच्यासाठी राज्य चालविणे ही तारेवरची कसरत असेल, व्यापार सुरळीत चालू राहतील. चैत्र व वैशाख या दोन महिन्यात व्यापारात मंदीचे वातावरण राहील.
जेष्ठ, आषाढ, श्रावण, या तीन महिन्यात व्यापारात पहिल्या दोन महीन्यापेक्षा थोडा फरक दिसून येईन, भाद्रपद महीन्यात स्वस्ताई राहील. अश्विन महिन्यात पुन्हा मंदीचे वातावरण राहील कार्तिक महिन्यात कांतीय नगरीसी म्हणजे उत्तर भागातील जनतेला पिडा होईल.
रोगराई व आगीपासून नूकसान होईल. मार्गशिर्ष पौष, माघ या तीन महीन्यात देशात आनागोंदी (अराजक) माजेल. फाल्गुन महिन्यात पाउस पडेल. असे भाकीत यामध्ये सांगण्यात आले यावेळी पंचागानुसार नक्षत्र व मासानुसारचे भाकीत ही विशद करण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी पाऊस काळात चांगला पाऊस होईल या भाकीतामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खरिपाच्या स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल. आगीपासून व चोरांपासून त्रास वाढेल लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील रब्बीचा स्वामी रवी असल्याने पाणी टंचाई निर्माण होईल, रोगराई वाढेल या भाकीताने शेतकऱ्याच्या आनंद क्षणिक ठरला.