वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनःस्ताप ! बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाथर्डी शहरातील बहुतांशी मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने पार्किंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

शहरातून कल्याण – विशाखापट्टणम् हा राष्ट्रीय महामार्ग, बारामती संभाजीनगर, नगर बीड, असे मार्ग जातत तसेच श्रीक्षेत्र मोहटादेवी, भगवानगड, मढी, आदी देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी असते, त्यामुळे शहरातील सर्व रस्ते नेहमीच गजबजलेले असतात.

अशातच अनेक खाजगी व अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या मध्येच तासंतास उभी केलेली असतात. तसेच पथविक्रेतेदेखील रस्ता अडवून आपला व्यवसाय करत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.

अशातच शहरातील जुने बस स्टँडच्या बाहेर येण्यासाठी नव्यानेच तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर खाजगी चारचाकी वाहने उभी करत अडथळा निर्माण केला जातो. यामुळे दिवसातून अनेकदा एसटी बस चालक व खाजगी वाहनधारकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन वादाचे प्रसंगही घडतात.

अशा प्रकारांमुळे वेळेवर इच्छित ठिकाणी जाता येत नसल्याने प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागतो. अशा बेशिस्त वाहनधारक व पथविक्रेत्यांवर पोलीस, पालिका व बांधकाम प्रशासनाने संयुक्त कारवाई करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.

तालुक्यात पर्यटनासह दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. अशातच आचारसंहितादेखील लागू झालेली आहे. यामुळे चुकीच्या पद्धतीने नंबर टाकणे, हॉर्न वाजवणे, वाहन चालवणे, यासह बेशिस्तपणे रस्त्यावर आडवी वाहने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर धडक कारवाई करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले आहे