Ahmednagar News : यावर्षी शहरात पाणीटंचाईची भयानक परिस्थिती निर्माण झाली असुन नागरिकांना एक एक हंडा पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाचा निष्काळजीपणा व सुरवातीपासूनच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे.
शहरातील बोअरवेल सह बहुतांश पाणीसाठे आटले असल्याने शहरातील सर्वच लोकसंख्या ही पालिका पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे.
त्यातच मागील दोन महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक पाणीपुरवठा संपूर्णपणे विविध कारणांनी विस्कळीत झाला आहे. पालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. पालिकेचा कारभार प्रशासक पाहत आहेत.
लोकसभा निवडणुका, आचारसंहिता व पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे इतर ठिकाणचा अतिरिक्त कारभार असल्याने त्यांचे कोणतेही लक्ष पालिका कार्यालय व पाणीपुरवठा विभागाकडे नसल्याने नागरिकांचा उद्रेक वाढत चालला आहे.
याबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी पालिका मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले असून प्रशासनाने तीन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली अन्यथा शहरातील नागरिकांच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख, अशोक मंत्री आदी उपस्थित होते.
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा पुर्णपणे विस्कळीत झाला असून दहा दिवसातून एकवेळ दुषीत पाणी नळावाटे मिळते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही आपण कोणतीही दखल घेतलेली नाही.
शहराला जायकवाडी धरणातून दैनंदिन गरजेपेक्षा खुपचं कमी पाणीपुरवठा होतो. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी फारसे गांभिर्याने घेत नाहीत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनेच्या कालबाह्य झालेले वीजपंप बदलले जात नाहीत.
शहरासाठी पाण्याचा कालावधी वाढवून मिळावा. जलशुध्दीकरण यंत्रणा अद्ययावत करण्यात यावी. पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी फोन उचलत नाही. ब-याचवेळा त्यांचे फोन बंद असतात. पाणीपुरवठा बाबत वस्तूनिष्ठ माहिती कर्मचारी सांगत नाही.
शहरामध्ये आज पाण्याला सोन्याचा भाव आला असून पाणी विकत घेऊन तहान भागवणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. काही भागात रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहतात. त्याची दुरूस्ती होत नाही. जिल्हा परिषदेचे योजनेकडे लक्ष नाही. अमरापूर येथुन भरले जाणारे टँकर त्वरीत बंद करावेत.
याबाबत आचारसंहितेचे कारण पुढे करून नागरीकांना वेठीस धरले जात आहे. येत्या दोन तारखेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होऊन आठवड्यातून किमान दोन वेळेस पाणी सुटावे. अन्यथा सर्वपक्षीय नागरीक गाव बंद ठेवून प्रसंगी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार घालू.
या बाबीची गांभिर्याने नोंद घेऊन कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले असून, या निवेदनावर जनता दलाचे भगवानराव बांगर, राष्ट्रवादीचे बंडूशेठ बोरुडे, सिताराम बोरुडे, मनसेचे संतोष जिरेसाळ, शिवसेनेचे भगवान दराडे, माजी नगरसेवक रमेश गोरे, रामनाथ बंग, चांद मणियार, आपचे सुभाषराव केकान, राजुशेठ शेवाळे, अजय भंडारी, सचिन नागापुरे, मुकुंद गर्जे, रतिलाल पटवा आदींसह सर्वपक्षीय नेत्यांच्या सह्या आहेत.