अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच वाळू तस्कराने हौदास माजवला आहे. यामुळे पोलीस प्रशासन देखील अलर्ट झाले असून या तस्करांवर कारवाई करत आहे.
नुकतेच नेवासा शहरातील चिंचबन रस्त्यावरील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एका टेम्पोसह तीन ढंपर नेवासा पोलिसांनी पकडले. यामध्ये सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून काहींनी चोरटी वाळू वाहतूक सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते व पोलीस नाईक राहुल यादव यांना खबऱ्याकडून वाळू चोरीबाबत माहिती मिळाली.
त्या दोघांनी चिंचबन रस्त्यावरील प्रवरा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीवर कारवाई केली. एका टेम्पोसह तीन ढंपरांना जागीच अडविले.
याप्रकरणी सोमनाथ आसाराम हिवरे, नितीन शंकर कुसळकर (रा. नेवासा) यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गीते करीत आहेत.