Nilwande Water : राहाता निळवंडे कालव्याची पहिली चाचणी झाली, यावेळी केलवड ते दगडपिंपरी गावातील कालव्याचे मोरीचे काम बाकी राहिल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. या कामासाठी त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या निधीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तात्काळ हे काम सुरू होणार असून केलवडला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
राहाता तालुक्यातील केलवड गाव हे १८२ गावांपेक्षा अतिसंघर्ष करणारे गाव म्हणून ओळखले जाते; परंतु याच गावात निळवंडे कालव्याचे पाणी आले नाही; त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. यामुळे रविवारी खा. लोखंडे यांच्या जनता दरबारात केलवड गावातील १० ते १५ शेतकरी गेले.
यावेळी मी केलवड गावात येतो, असे खा. लोखंडे यांनी सांगितले व सोमवारी २ वाजता खासदार गावात आले. शेतकऱ्यांच्या बांधावर बैठक लावली. यावेळी जलसंपदाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. यावेळी हा प्रश्न खा. लोखंडे यांनी मार्गी लावला.
केलवड हा भाग कोपरगाव शाखेत येतो, यासाठी टेंडर काढले आहे, परंतु ठेकेदार निवडला नाही. त्यामुळे हे काम दिवसेंदिवस उशिरा होत असल्याने निळवंडे कालव्याच्या दुसर्या चाचणीतदेखील केलवड गाव पाण्यापासून वंचित राहत होते. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. गावातील दोन तलावदेखील भरून काढण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, शाखा अभियंता विवेक लव्हाट, गंगाधर गमे, सरपंच दीपक कांदळकर, नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे यांच्यासह गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
निळवंडेसाठी संघर्षाची सुरुवात केलवड गावात झाली. आजपर्यंत अनेक नेते झाले; परंतु खासदार सदाशिव लोखंडे हे आमच्या निळवंडे पाण्याचे जनक असून तेच या गावाचा प्रश्न मार्गी लावणार आहेत. त्यांनी दिलेल्या निधीतून हे काम झाल्यावर गाव मोठी मिरवणूक काढणार असून जल्लोष साजरा करणार आहे – गंगाधर गमे
केलवड हे गाव निळवंडे च्या संघर्षामधील एक गाव आहे. त्यांनी खूप आंदोलने केली असून लाट्या खाल्ल्या आहेत. खासदार म्हणून या गावाच्या कामासाठी मी ५ लाख देत आहे. जनतेचा सेवक म्हणून मी हे काम पूर्ण करणार आहे. सदाशिव लोखंडे, खासदार, शिर्डी
केलवडला लवकर पाणी येणार
वारंवार प्रतिक्षा करणारे केलवड गाव आता निळवंडेच्या दुसऱ्या चाचणीत पाण्याचा उपभोग घेणार आहे. पाच लाखात दगडपिंपरी येथील मोरीच्या कामासाठी मुरूम, माती व कागदाचा वापर करून पाणी गावात काढले जाणार आहे. गावातील काही तलावदेखील भरविले जाणार आहेत.