अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाषणातून चांगलीच फटकेबाजी केली. राज्यपालांनी आयुर्वेद आणि योगाचे महत्व विशद करताना चरक यांनी पाळलेल्या एका पोपटाची गोष्ट सांगितली.
‘चांगल्या आरोग्यासाठी गैरमार्गाने नव्हे तर कष्टाने कमावलेले खा, असे तो पोपट सांगत असे. आजच्या काळात मात्र हे कसले पोपट जन्मले आहेत, काय माहिती? असा टोला त्यांनी लगावला.
प्रवरानगर येथे प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटलचे भूमिपूजन करण्यात आले. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या प्रवरा अभिमत विद्यापीठाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
आपल्या भाषणात राज्यपालांनी चरक यांच्या पोपटाची गोष्ट सांगितली. ‘एकदा एक व्यक्ती चरक यांच्याकडे गेली. चांगल्या आरोग्यसाठी काय करावे, असा सल्ला विचारल्यावर चरक यांनी हे आपल्या पोपटला विचारा, असे सांगितले.
त्या व्यक्तीने पोपटला विचारले. पोपटाने त्यांना सल्ला दिला की, चांगल्या स्वास्थ्यासाठी हित भूक, मित भूक आणि रित भूक महत्वाची आहे.
म्हणजे चांगले आणि पचेल तेच खा, थोडे आणि योग्य तेवढचे खावे आणि गैरमार्गाने नव्हे तर कष्टाने कमावलेले खावे, असा सल्ला त्या पोपटाने दिला.’ गोष्ट सांगून झाल्यावर राज्यपाल म्हणाले, ‘असे पोपट त्या काळात होते.
आजच्या काळात हे कसले पोपट जन्मलेत काय माहिती?’ असे सांगण्यामागे त्यांचा रोख कोणाकडे होता, यावरून चर्चा सुरू झाली. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, राजकीय क्षेत्रात काम करताना लोक टीका करत असतात.
मात्र, त्यासोबत सामाजिक कार्याची जोड असेल तर पिढ्यानपिढ्या तुम्ही लोकांसोबत राहू शकता. विखे कुटुंब याचेच उदाहरण आहे.’ असेही राज्यपाल म्हणाले.