Ahmednagar News : केलेल्या कामाचा गाजावाजा करणे माझ्या स्वभावात नाही. आमदार असताना देखील मी ते केले नाही. आता खासदारकीच्या काळातही खासदार निधी व्यतीरिक्त रिक्त मतदारसंघात ६०० कोटींची कामे केली. केंद्राच्या अनेक योजना आणल्या.
कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर काही ठिकाणी कार्यक्रम केली परंतु गाजावाजा करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकास कामे करण्यावर माझा भर होता, असे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार लोखंडे उत्तर नगरमध्ये झंझावती प्रचार करत आहेत. या प्रचार दौऱ्यात कॉर्नर सभा, बैठकात खासदार लोखंडे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, मी कोणती विकासकामे केली त्याचे प्रगती पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यामध्ये रस्ते, शाळेमध्ये ‘ई-लर्निंग, जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खेळाचे साहित्य, नगरपालिका हद्दीतील चौक सुशोभीकरण, प्रत्येक नगरपालिका हद्दीत योगाभवन, ओपन जीम, सभामंडप, स्मशानभूमी सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्याची टाकी, विविध मंदिर परिसरात सुशोभीकरण, हायमॅक्स, सोलर दिवे आदी कामांचा समावेश आहे.
कोरोनाच्या काळात दोन वर्षे खासदार निधी हा पूर्णपणे कोविड सेंटरला वर्ग करण्यात आला. त्यामुळे या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची कामे झाली नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा निधी मिळाला असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.
तत्पूर्वी सत्तेत असतानाही निधी मिळाला नसल्याची खंतही खा. लोखंडे यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या काळात लोकांना योगासनाचे महत्त्व कळाले. परंतु आपत्ती काळात योगा करण्यासाठी जागाच उपलब्ध नव्हती.
खासगी मंगल कार्यालय मालक योगा करण्यासाठी जागा देत नसल्याने व योगाच्या प्रचार प्रसाराला हातभार लागावा या उद्देशाने प्रत्येक नगरपालिका हद्दीत योगा भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
एक योगा भवनाची किंमत ही ८० लक्ष एवढी आहे. त्यासाठी देखील निधी उपलब्ध केला आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी भागात टॉवरच्या अभावी मोबाईलला रेंज नसते. संभाषणा बरोबरच ऑनलाईन बँकीग, मुलांचे ऑनलाईन कोर्स सारख्या सुविधांवर त्याचा परिणाम होतो.
त्यामुळे केंद्राच्या बीएसएनएलच्या आदिवासी योजनेतून ३२ मोबाईल टॉवर बसविण्यात आले. त्यामुळे आदिवासी भागात मोबाईल सुविधा उपलब्ध झाली. खा. लोखंडे यांच्या सभांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.