खा. सुजय विखे म्हणतात.. संरक्षणमंत्री व्हावं लागेल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार झाल्यानंतर अनेक मोठ्या कामांना हात घातला. त्यांचा अभ्यास आणि त्यांची टोलेबाजी करण्याची शैली सर्वश्रुत आहेच.

त्यांनी आपल्या याच खास शैलीत टाकळीकाझी (ता. नगर) येथे फटकेबाजी केली. अहमदनगर-जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण-नुतनीकरण भूमिपूजन कार्यक्रम टाकळीकाझी (ता. नगर) येथे पार पडला. या कार्यक्रमाला व्यासपीठावर भाजपच्या लोकप्रतिनिधींसोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के देखील होते.

हाच धागा पकडत खासदार विखे पाटील यांनी चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले ‘नगर जिल्ह्यात प्रत्येक गोष्ट संरक्षण खात्याशी निगडीत आहे. संरक्षण विभागाचे खुप कामे आहेत. एक संपले की दुसरे येते. उड्डाणपूलाचा प्रश्न सुटला की के के रेंज येतो. के के रेंज झाले की नगर-जामखेड रस्ता, मग पुढे बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन.

त्यामुळे असे वाटते संरक्षणमंत्री झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही.’ पुढे बोलताना ते म्हणाले , ‘संपत म्हस्के हे आज व्यासपीठावर आहेत. ते महाविकास आघाडीत आहेत. महसूलमंत्री त्यांच्या पक्षाचे आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री सुद्धा दौऱ्यात होते.

त्यामुळे आपल्याला काही निधी वाढून मिळतो का, यासाठी लक्ष देण्यास त्यांना सांगा. तसेच आम्हाला निधी वाढेल, याची अपेक्षा नाही. पण सांगणे आमचे काम आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे तालुकाध्यक्ष आहात,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24