Ahmednagar News : दूध तसेच कांद्याच्या दरासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चास मोठा प्रतिसाद लाभला.हजारो शेतकऱ्यांसह जनावरांचाही या आंदोलनात सहभाग आहे. आंदोलक कार्यालयाबाहेर पोहचल्यानंतर घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमले होते. दरम्यान, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने खा. लंके यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या दिला आहे.दरम्यान खा.लंके यांच्याशी चर्चा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील हे आंदोलनस्थळी आले होते.मात्र हे प्रश्न शेतकऱ्यांच्या संबंधित व गांभीर्याचे असल्याने चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच यावे या भूमिकेवर लंके ठाम राहिल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना खा.लंके म्हणाले, फक्त घोषणा करायच्या, पाच टक्के शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत नाही. कागदपत्रे गोळा करण्यासाठी नादी लावायचे, चार दोन लोकांना अनुदान मिळाले तरी त्याचे चेक वाटपाचे कार्यक्रम केले जातात. तुम्ही आम्हाला भिक देता काय ? शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे.
लंके पुढे म्हणाले, आज आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन केले आहे. सरकारने दखल घेतली नाही तर राज्याच्या राजधानीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल. त्या आंदोलनात मुकी जनावरेही आणली जातील. आज आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही याच ठिकाणी जनावरांची छावणी सुरू करून बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बाबासाहेब भोस, महादेव राळेभात, राजेंद्र आघाव, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, किरण काळे, किरण कडू, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, संदीप कर्डीले, प्रकाश पोटे, शिवशंकर राजळे, गहिनीनाथ शिरसाठ, अर्जुन भालेकर, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, रोहिदास कर्डीले, योगीराज गाडे, खंडू भुकन, केशव बेरड, शरद बडे, किसनराव लोटके, सिताराम काकडे, सुदाम पवार, नलीनी गायकवाड, सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे, रामदास भोर, अप्पासाहेब शिंदे, नवनाथ रासकर, योगेश मते, डॉ. बाळासाहेब कावरे, भुषण शेलार, बाळासाहेब खिलारी, ओमकार सातपुते, सुभाष शिंदे, डॉ. सचिन औटी, बाळासाहेब नगरे, सतिश भालेकर, रविंद्र राजदेव, श्रावण काळे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.
सरकारने पाच रूपये अनुदानाची पुन्हा घोषणा केली आहे. ही भिक आहे, आमचे हक्काचे आम्हाला द्या. शेजारी गुजरातमध्ये गेले तर दुधाला ४० रूपये लिटरचा भाव मिळतो. पंजाबमध्ये ४५ रूपये दर मिळत असताना महाराष्ट्रात ही स्थित का आहे ? असे असेल तर शेतकरी गप्प बसेल का ? शेतकऱ्यांठी आम्ही लढा उभा केला असल्याचे लंके म्हणाले.
आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये नेते, कार्यकत्यांची गर्दी झाल्याने खा. नीलेश लंके यांनी मंडपाबाहेर येत समोर उन्हामध्ये बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये ते जाऊन बसले. उशिरापर्यंत खा. लंके हे उन्हामध्येच बसून होते.
दुधाला बाजारभाव मिळालाच पाहिजे, कांद्याला बाजारभाव मिळालाच पाहिजे, नाकर्त्या सरकारने केलाय वांधा, मातीमोल विकतोय दुध व कांदा, शासनाचा आदेश घडोघडीला शेतकरी लावलांय देशोधडीला अशा अशायाचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातात होते. मी शेतकरी असे लिहिलेल्या टोप्या परीधान केलेले आंदोलक लक्ष वेधून घेत होते.
गृहमंत्री आणि दुधाचा काय संबंध ?
पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांची जाण असेल तर त्यांनी दुधाला हमीभाव देणे गरजेचे आहे. पालकमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली, दुधाचा आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा संबंध काय ? दुधाच्या प्रश्नासंदर्भात मी सुप्रियाताई सुळेंंसह पियुष गोयल यांना भेटलो. गोयल यांनीही हा प्रश्न राज्य पातळीवरील असल्याचे सांगितले. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. चुकीच्या बातम्या प्रसारीत करून धुळफेक करणे हे आता चालणार नाही. – खासदार नीलेश लंके
आऊटपुट घेऊनच जाणार
आमच्या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला हात जोडता येतात आणि बाह्या देखील वर करता येतात. शेवटी आमचे नाते शेतकरी, सर्वसामान्य जनतेशी आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात आलो आहोत, येथून आऊटपुट घेऊनच जाणार असल्याचा निर्धार खा.नीलेश लंके यांनी केला.
खा. लंके यांनी शब्द पाळला
केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी नागवला जात असून शेतमालास भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये दोन्ही सरकारविषयी रोष आहे. अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये केंद्रामध्ये भाजपाला बहुमत न मिळाल्याने काही राज्यांच्या पाठींब्यावर मोदी सरकार सत्तेवर आले आहे. आपण, इंडिया आघाडी विरोधी भूमिकेत आहोत. लोकसभा निवडणूकीदरम्यान खा. नीलेश लंके यांनी कांदा व दुधाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा शब्द दिला होता. आज आंदोलन करून त्यांनी त्यांचा शब्द पाळला आहे.
राजेंद्र फाळके
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस