‘त्या’ बँकेतील आठ कर्मचारी एकाच दिवशी कोरोना बाधित !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- स्टेट बँकेच्या येथील शाखेतील आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी बॅँकेचे कामकाज बंद ठेवण्यात आले. बँकेतील एकूण बारा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या.

त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. निगेटिव्ह अहवाल आलेल्या अधिकाऱ्यांच्या घशातील स्त्राव घेण्यात आले असून या अहवालाची प्रतीक्षा आहे. गुरूवारी (२९ ऑक्टोबर) इतर शाखांमधील कर्मचारी उपलब्ध झाल्यावर बँकेचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सकाळी सात कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल मिळाल्यानंतर तातडीने बॅँकेचे व्यवहार बंद करण्यात आले. एटीएम आणि कॅश डिपॉझिट यंत्रणा बंद असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. बँकेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना परतावे लागले.

आठपैकी सात कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना कर्जुलेहर्या येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात, तर एका कर्मचाऱ्याला शिरूर (पुणे) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली. टाळेबंदीनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना नागरिकांमधील कोरोनाविषयीचे भय आणि गांभीर्यही कमी झाले आहे.

त्यामुळे सामाजिक अंतर, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे.

प्रशसनाकडूनही प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

अहमदनगर लाईव्ह 24