अहमदनगर बातम्या

श्रीरामपूर पंचायत समिती सभापती पदाची निवड आज पार पडणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदाची जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती मिळावी म्हणून पंचायत समिती सभापती संगीता शिंदे यांनी ग्रामविकासमंत्री यांच्याकडे अपील केले होते.

मात्र शिंदे यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज होणार आहे. पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ. संगीता सुनील शिंदे यांनी पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका डॉ. सौ. वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केली होती.

याप्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी वंदना मुरकुटे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यामुळे सौ. वंदना मुरकुटे यांचा सभापती पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाच्या विरोधात संगिता शिंदे यांना ग्रामविकास मंत्र्यांकडे दाद मागता येवू शकते. असेही जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयात नमूद केले होते.

त्यानुसार शिंदे यांनी ग्रामविकासमंत्री यांच्याकडे अपील केले होते. मात्र जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची बाब या न्यायधिकारणाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे नमूद करून ग्रामविकासमंत्र्यांनी सौ. संगीता शिंदे यांचा अर्ज फेटाळला आहे.

दरम्यान श्रीरामपूर पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक आज गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी होत आहे. सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया केली जाऊ शकते परंतु सभापतिपदाची निवड (निकाल) घोषित करू नये, असे न्यायालयाचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे पंचायत समिती सभापती पदाची निवड आज गुरुवार दि.18 रोजी होणार असली तरी तिचा निकाल राखीव ठेवला जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office