विद्युत खांबावर कमी उंचीवर असलेले वीज मीटर तर उघड्या डीपीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- शहरातील मुकुंदनगर भागातील रहिवाशांच्या वीज मीटर व डीपीच्या प्रश्‍नासंदर्भात जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने विद्युत महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, फारुक शेख, शहाबाज शेख, शहानवाज शेख, शब्बीर सय्यद, मीजान कुरेशी, मुर्शिद शेख, रिजवान सय्यद, नसीर सय्यद, अजय सोळंकी, मच्छिंद्र गांगर्डे, वसीम शेख आदिंसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मुकुंदनगर येथील नागरिकांच्या घराचे मीटर एकत्रित रित्या त्यांच्या घरासमोरील विद्युत खांबावर बसवण्यात आले आहे. सदर काम ठेकेदाराने नियमाप्रमाणे केले नसून, अनेक ठिकाणी या बॉक्सची उंची ही जमिनीपासून कमी अधिक प्रमाणात ठेवलेली आहे. काही ठिकाणी तर जमिनीपासून अवघ्या चार फूट उंचीवर हे बॉक्स बसविण्यात आले आहे. सदरचे ठिकाण हे अत्यंत गजबजलेल्या रहिवशी ठिकाणी आहे. या भागातील लहान मुले सदर परिसरात खेळत असतात.

मीटर बॉक्सच्या केबलला किंवा केबल कट झाल्यामुळे विद्युत खांबावर करंट उतरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या भागात अनेक वर्षापासून बसवलेली डीपी त्याच रहदारीच्या ठिकाणी अगदी रोडलगत बसवण्यात आलेली आहे. या डीपीच्या केबल व मीटर बॉक्स पूर्णपणे उघड्या अवस्थेत आहेत. त्या डीपीच्या बाजूस संरक्षण भिंत किंवा तार कंम्पाऊंड करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

विद्युत खांबावर कमी उंचीवर बसविण्यात आलेले मीटरला योग्य ठिकाणी नियमाप्रमाणे लावावे व डिपीला संरक्षक कंम्पाऊंड टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्याला विद्युत महावितरण कार्यालय जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट करुन, सदर प्रश्‍न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24