अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-पारनेर शहरात खाजगी कार्यशाळेची विज जोडणी करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
महावितरणकडून विजपुरवठा बंद करण्यात येउनही वाहिनीमध्ये विजेेचा प्रवाह आल्याने ही दुर्घटना घडल्याचे पारनेरचे उपअभियंता प्रशांत आडभाई यांनी सांगितले.
शनिवारी विविध कामांच्या निमित्ताने पारनेर शहर व परिसरातील विजपुरवठा बंद असतो. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महावितरणचा ठेकेदार गाडीलकर याने रितसर परवाणगी घेऊन मंदार भुषण नाईक यांच्या कार्यशाळेच्या विज जोडणीचे काम सुरू केले होते.
पोलवर मुकुंदा रोडे (वय २३ रा.परभणी हल्ली रा. पठारवाडी ता. पारनेर) हा ठेकेदाराचा कर्मचारी विजजोडणीचे काम करीत होता. विजपुरवठा बंद असल्याची खात्री झाल्यानंतर त्याने जोडणीचे काम सुरू केले.
काम सुरू असतानाच अचानक तारांमध्ये विजप्रवाह आला. त्यात रोडे हा वाहीनीस चिकटून त्याचा खांबावरच मृत्यू झाला. त्यास खाजगी रूग्णालयातही हालविण्यात आले परंतू डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.