अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथील विद्युत महावितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागून बाह्यस्रोत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. २२ रोजी सकाळी घडली.

गेल्या दोन वर्षांतील जेऊर सब स्टेशन अंतर्गत विजेचा शॉक लागण्याची ही चौथी घटना घडली आहे. यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,

जेऊर सब स्टेशन येथे कनिष्ठ यंत्रचालक म्हणून दत्तात्रय राधाकिसन आहेर (वय २२ रा.भातकुडगाव ता. शेवगाव) बाह्यस्त्रोत कर्मचारी काम करत होता. डोंगरगण फिडरवरील विजे मध्ये (चेंज ओहर) बदल करत असताना दत्तात्रय आहेर यास विजेचा शॉक लागला.

त्यास उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे घोषित करण्यात आले. दत्तात्रय हा एकुलता एक मुलगा असून अविवाहित होता. वडील शेतकरी आहेत. सुमारे तीन महिन्यापूर्वीच तो कामावर हजर झाल्याची माहिती मिळत आहे.

जेऊर सब स्टेशन अंतर्गत गेल्या दोन वर्षातील कर्मचाऱ्यांना शॉक बसण्याची ही चौथी घटना आहे. सुदैवाने यापूर्वीच्या घटनेत तिघेजण बचावले होते. बहिरवाडी येथे तारतंत्री श्रीनिवास डोमल तर इमामपूर येथे बाह्यस्रोत कर्मचारी विक्रम मोकाटे यांना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. तसेच सब स्टेशनमध्येच तारतंत्री एन. आर. कणके यांना देखील विजेचा शॉक बसल्याची घटना घडली होती.

महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काम करताना कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येते. आवश्यक ती सुरक्षा विषयक साधने पुरविली जात नाहीत. सुरक्षा विषयक साहित्य कर्मचाऱ्यांना पुरवणे गरजेचे आहे.

जेऊर सबस्टेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून समजली. जेऊर येथील सबस्टेशन कार्यालय हे बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालू आहे. येथे नियुक्तीस असलेले तारतंत्री बाह्यस्त्रोत कामगारांकडूनच काम करून घेतात.

अर्धकुशल कामगारांना कामाची पूर्ण माहिती नसल्याने देखील शॉक बसण्याच्या घटना घडत आहेत. कार्यालयातील सर्व तारतंत्री व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार थांबणे गरजेचे आहे. अर्ज न देता गैरहजर राहणे, मनमानी पद्धतीने कामावर येणे, शेतकऱ्यांचे फोन न उचलणे,

नादुरुस्त विद्युत वाहिन्या, रोहित्र तात्काळ दुरुस्त करणे अशा अनेक तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. आजच्या घटनेत बाह्य स्रोत कर्मचाऱ्याला आपला जीव गममावा लागला असून महावितरण कंपनीने बोध घेण्याची गरज असल्याचे मत जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

• पोलिस मित्र पथकाची मदत

महावितरण कंपनीच्या कार्यालयात घडलेल्या घटनेची माहिती जेऊर येथील पोलिस मित्र पथकाला समजताच सरपंच भीमराज मोकाटे, मायकल पाटोळे, शशिकांत पवार यांनी घटनास्थळी जाऊन दत्तात्रय आहेर याला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे घोषित करण्यात आले.

Ahmednagarlive24 Office