अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सहल म्हटली की प्राथमिक मुलांना फक्त फिरण्याचा आनंद कसा घेता येईल, खाण्यापिण्याची मज्जा कशी करता येईल एवढ्या उद्देश असतो. पण आज आपल्या महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी शैक्षणिक सहलीमुळे इतिहासाबरोबरच वैज्ञानिक दृष्टीकोनाला महत्व दिले याचा खूप आनंद वाटतो असे प्रतिपादन रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळदास लोखंडे यांनी केले.
वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.एन.जे. पाउलबुधे महिला कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा शैक्षणिक सहलीचा समारोप शिवनेरी किल्ल्यावर करण्यात आला, यावेळी डॉ. लोखंडे बोलत होते.
या प्रसंगी प्रा. वंदना घोडके, डॉ. सुचित्रा डावरे, प्रा. ऐश्वर्या गोयल, प्रा. प्रफुल्ल आमले, एस.ए.रणधीर आदींसह कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डॉ. लोखंडे पुढे म्हणाले, शैक्षणिक सहलीचा आनंद जरुर लुटा पण त्याचबरोबर आपण जेथे जातो तेथील प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण करा, त्यामागे काय इतिहास आहे? याचा अभ्यास करा म्हणजे इतिहासाबरोबरच तुमचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढेल.
शिवनेरी किल्ल्याला भेट दिल्यानंतर गडावरील अंबरखाना, शिवकुंज, सातवीची वाट, सात दरवाज्यांची वाट याचा इतिहास जाणून घ्या असे म्हणाले. शिवनेरी किल्ल्यावर या शैक्षणिक सहलीचा समारोप करताना प्रा. वंदना घोडके यांनी सांगितले की, डॉ. पाउलबुधे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी या सहलीमध्ये भिमाशंकरला भेट दिल्यावर तेथील विविध वनस्पतींची ओळख करुन घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचे महत्व पटवून दिले.
डिंभे धरणाला भेट देवून तेथे आलेल्या पर्यटकांना विद्यार्थिनींनी पाणी आडवा व पाणी जिरवा या उक्तीप्रमाणे अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग कसा असतो? याचे महत्व सांगितले. शिवनेरी किल्ल्याला भेट दिल्यानंतर येथील इतिहास जाणून घेतला. या सहलीमुळे आम्हाला व विद्यार्थिनींना एक महत्व लक्षात आले की, पाण्यामुळे गाव, शहर व देश कसा स्वयंपूर्ण होतो हे समजले. या सहलीचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य, शिक्षकवृंद यांचे संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, बी.एड.च्या प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा यांनी कौतुक केले.