जिल्ह्यात ७०५ ग्रामपंचायतींसाठी दुपारी साडेतीन पर्यंत सरासरी ७१ टक्के मतदान मतदानासाठी युवा मतदारांसह वृद्धांचाही उत्साह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७१.४६ टक्के मतदान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी दिली. सायंकाळी उशीरापर्यंत मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

त्यामुळे सायंकाळी मतदान संपेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी मिळण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचारी यांनी चोख नियोजन केल्याने जिल्हयात शांततेत मतदान पार पडले. आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला.

जिल्ह्यात अकोले तालुक्यातील ३६ ग्रामपंचायती, संगमनेर -९०, कोपरगाव- २९, श्रीरामपूर- २६, राहाता -१९, राहुरी -४४, नेवासा- ५२, नगर-५६, पारनेर-७९, पाथर्डी- ७५, शेवगाव- ४८, कर्जत-५४, जामखेड-३९ आणि श्रीगोंदा तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पाडली.

या निवडणुकीसाठी ६ लाख ८६ हजार ३४१ महिला मतदार तर ७ लाख ५४ हजार ५८० पुरुष मतदार आणि इतर आठ असे एकूण १४ लाख ४० हजार ९२९ मतदार होते. सकाळच्या पहिल्या सत्रात सकाळी ७-३० ते ९-३० या दरम्यान मतदानाची टक्केवारी ही केवळ ११.९७ टक्के एवढी होती.

त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण ४ लाख ४३ हजार ८४ मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ३०.७५ टक्के इतकी होती. दुपारी दीड वाजता मतदानाने पन्नाशीचा टक्का ओलांडला.

एकूण मतदारांपैकी ७ लाख ४४ हजार २९८ मतदारांनी मतदान केले. मतदानासाठीचा हा उत्साह अनेक ठिकाणी मतदान संपेपर्यंत पाहायला मिळाला. दुपारनंतर मतदान केंद्रावर अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण १० लाखाहून अधिक मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता.

मतदानाची ही टक्केवारी ७१.४६ इतकी होती. जिल्हास्तरावरुन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी समन्वयन केले तर प्रत्येक तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी तथा तहसीलदार यांच्या प्रत्यक्ष निगराणीत मतदान प्रक्रिया पार पडली.

या निवडणूकीसाठी पाचशेहून अधिक अधिकारी तर पंधरा हजाराहून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी ही प्रक्रिया अतिशय चोखपणे पार पाडली.

अहमदनगर लाईव्ह 24