अहमदनगर बातम्या

नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी उद्योजक अमित पंडीतला अटक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : संगमनेर शहरातील उद्योजक अमित पंडीत याला नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी काल शनिवारी दुपारी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित पंडित याने विविध कंपन्या स्थापन करून या कंपन्यांच्या नावावर नगर अर्बन बँकेमधून मोठ्या प्रमाणावर कर्ज काढले होते. कर्जाची मोठी थकबाकी असतानाही या कंपन्या परस्पर विकून त्याने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले होते. अर्थिक गुन्हा शाखेने त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल होता.

एक कंपनी रजिस्टर करायची नंतर ही कंपनी दुसऱ्या कंपनीला विकायची असा प्रकार पंडित याने केला. अर्बन बँकेचे कर्ज नियमीत न भरल्याने पंडित याच्या कर्जाचे थकबाकी कोट्यावधी रुपयांची झाली होती.

नगर अर्बन बँकेला कर्ज न भरल्याने बँकेचे मोठे नुकसान झाले. कागदात अफरातफर, बनावट कागदपत्रे, बँकेची फसवणूक, असे आरोप त्याच्यावर होते. पोलीस आपल्यावर कोणत्याही क्षणी कारवाई करतील, याची त्याला जाणीव झाल्याने तो काही दिवसांपासून गायब होता.

संगमनेर शहरात आज एका विवाह सोहळ्यासाठी तो निश्चित हजर राहणार याचा अंदाज आल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पथक तयार करून त्याचा शोध सुरू केला.

एका लग्न सोहळ्यात तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर पोलीस त्याच्या संगमनेर महाविद्यालय जवळच्या घरी पोहोचले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी पंडित याला राहत्या घरातून अटक केली.

पंडित याला अटक झाल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहे. तो काही वर्ष अमृतवाहिनी बँकेचा अध्यक्षही होता. मात्र अचानक त्याची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून पंडित याच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.

Ahmednagarlive24 Office