जून महिन्यात विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, शाळा सुरू होऊन ३० ते ४० दिवस उलटून गेले असताना देखील श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमारे १८ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला आहे, त्या गणवेशाचा दर्जादेखील सुमार असल्याचे पालकांमध्ये बोलले जात आहे. तर अद्यापपर्यंत १६ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचे कापड मिळाले असल्याची माहिती मिळाली असल्याने शिक्षण विभागाच्या ढिसाळ कामाची चर्चा होत आहे. गणवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी प्रतीक्षा सहन करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद शाळेत जाणारे बहुदा विद्यार्थी हे सर्व सामान्य कुटुंबातील आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी राज्य सरकारने सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट व दररोज पोषण आहार देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
मागील वर्षापर्यंत शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व बूट देण्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांची होती. तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश शाळा होण्याच्या पहिल्या दिवशी दिला जात होता. मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना उलटून गेला असताना देखील विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
त्यातच तालुक्यातील शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २४ केंद्रांतील १८ हजार २५९ विद्यार्थ्यांच्या गणवेशाची मागणी केली असताना शासनाकडून अवघ्या १६ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे मटेरिअल मिळत आत्तापर्यंत फक्त २४ पैकी एका केंद्रातील ४७८ विद्यार्थ्यांना गणवेश पोहोच झाला असून, उर्वरित १७ हजार ७८१ विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेतच आहे. मिळालेल्या गणवेशाचा दर्जादेखील सुमार असल्याची चर्चा पालकांमध्ये होत आहे.
मागील वर्षापर्यंत काही कारणास्तव शिक्षकांकडून गणवेश देण्यासाठी एक दिवस जरी उशीर झाला तर लगेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जायची.
यावर्षी शाळा सुरू होऊन एक महिना झाला असताना देखील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाला नाही, याला जबाबदार कोण? गणवेश देण्यास उशीर झाल्याबद्दल राज्य शासन आता कोणावर कारवाई करणार, असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी अद्याप गणेश मिळाले नाही. त्यामुळे गणवेश मिळणार कधी, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांबरोबर पालकांनादेखील लागली आहे.