Ahmednagar News : निंबोडी शाळा दुर्घटनेला ६ वर्षे होवूनही पालक न्यायाच्या प्रतीक्षेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : नगर तालुक्यातील निंबोडी येथे २८ ऑगस्ट २०१७ रोजी शाळेतील वर्ग खोलीचा स्लॅब आणि भिंत कोसळून वैष्णवी प्रकाश पोटे, सुमित सुनील भिंगारदिवे, श्रेयष प्रवीण रहाणे या तीन निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर पाच मुलं गंभीर जखमी झाली होती.

त्यानंतर या घटनेतील मृत विद्यार्थिनी वैष्णवी प्रकाश पोटे हिच्या वडिलांनी घटनेस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मात्र सदरच्या घटनेला सहा वर्ष उलटूनही अद्यापही मृत विद्यार्थ्यांचे पालक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

या दुर्दैवी घटनेची केस ही जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे वरिष्ठ न्यायालयात सुरू आहे. सदरच्या घटनेनंतर नगर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक खराब शाळा वर्ग खोल्यांचे प्रश्न निर्माण झाले.

अहमदनगर जिल्ह्यात जवळपास ८०० वर्ग खोल्या वापरण्यास योग्य नसल्याचे तपासणीनंतर जिल्हा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले. मात्र आजही अनेक ठिकाणी खोल्यांअभावी एकत्रित वर्ग भरवण्यात येत आहेत.

नगर तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांचे निर्लेखन केले गेले आहे. तरीही जवळपास ३६ शाळा वर्ग खोल्यांच्या निर्लेखनाचा प्रश्न अद्याप काही कारणांमुळे बाकी आहे. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील जामगाव येथे घडली.

त्या ठिकाणीही अशीच एक वर्ग खोली कोसळली, परंतु केवळ सदरची घटना ही रविवारी रात्री घडल्याने सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जीर्ण वर्ग खोल्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.