अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : महिना उलटूनही गारपीटग्रस्तांना कवडीचीही मदत नाही, महसूलमंत्री विखेंचा दौरा होऊनही शेतकरी वंचितच

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नोव्हेंबर महिन्यात पारनेर तालुक्यातील ४९ गावांना गारपीटीचा फटका बसला. महिना उलटूनही एक रूपयांची शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

प्रशासन पंचनामे करण्याचा सोपस्कार उरकून मोकळे झाले असून उध्वस्त बळीराजाचे डोळे शासकीय मदतीकडे लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील दौरा करत पंचनाम्याच्या सूचना केल्या होत्या.

पारनेर तालुक्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे १२ हजारावर हेक्टरला फटका बसला आहे. गारपीटीमध्ये शेतीपीके, फळबागा व जनावरांच्या चार्‍याचेही मोठे नुकसान झाले होते. त्यात तालुक्यातील ४९ गावे बाधित झाली आहेत. या आवकाळी पावसाचा व गारपिटीचा फटका तालुक्यातील १० हजार ४५२ शेतकर्‍यांना बसला आहे.

शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई पोटी १० कोटी ५४ लाख रूपयांची मागणी प्रशासनाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे. गारपीटीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान पारनेर तालुक्यात झाले आहे. नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रामुख्याने सर्वाधिक फटका पानोली, वडूले, सांगवी सूर्या व गांजीभोयरे या चार गावांना बसला आहे. पिंपळनेर, जवळा, राळेगण थेरपाळ व निघोज परीसरातील शेतीपिकांसह जनावरांचा चारा व फळबांगाचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या कांद्याचे बाजार कमी झाले आहेत. या शिवाय दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहेत. त्यामुळे शेतकरी मुळातच हवालदिल झाला आहे. तालुक्यातील खरीप पिके कमी पावसामुळे वाया गेली होती. रब्बीलाही गारपीटीमुळे मोठा फटका बसला आहे.

शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली

महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन वेळा पारनेर तालुक्यातील जवळा, सांगवी सूर्या, वडुले, पानोली आदी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करत शेतकर्‍यांशी संवाद साधला होता. जिल्हाधिकार्‍यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे सादर करून महिना उलटला मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला अद्याप पाने पुसली आहेत.

गारपिटीने नुकसान झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिरायत – १०४३.७८

बागायत- ४९४४.०८

फळबागा- ५५५.५५

एकूण- ६५४३.४१

बाधित शेतकरी-१० हजार ४५२

Ahmednagarlive24 Office