अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात राळेगणसिद्धीत (ता. पारनेर) शुक्रवारी सायंकाळी तासभर चर्चा झाली. मात्र त्यानंतरही अण्णा ३० जानेवारीला आंदाेलन करण्यावर ठाम आहेत.
स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात येऊन अधिक ५० टक्के उत्पादन खर्च द्यावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगास स्वायत्तता देण्यात यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत आंदोलन करणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत पोहोचले. त्यांच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित होते. हजारे यांच्याबरोबर त्यांनी एक तास चर्चा केली.
हजारे यांनी फडणवीस यांना केंद्र सरकारने दिल्ली आणि राळेगणसिद्धी येथे झालेल्या आंदोलनानंतर दिलेल्या लेखी आश्वासनाबाबतची पत्रे दाखविली.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसह इतर प्रश्नांवर यावेळी चर्चा केली. चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यांच्या मागण्याबाबत केंद्र सरकारबरोबर चर्चा करून मार्ग काढले जातील, असे अण्णांना सांगितले.