अहमदनगर बातम्या

मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच परतणार : जरांगे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शासनाला सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान आहे. वारंवार आंदोलने, उपोषणे करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर,

आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचे प्रतिपादन मराठी बांधवांचा शूर योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. सुपा, ता. पारनेर येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठी बांधवांना संबोधित केले, यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आहे की, मी तुमच्या जीवावर मुंबईकडे कूच करत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी गुलाल घेऊनच घरी येईल, विश्वास ठेवा.

मी मरणाला भीत नाही, आता माघार नाही, सरकारने लय प्रयत्न केले, पण मी मॅनेज होणाऱ्यातला नाही. म्हणून त्यांचे फगाणा. आता मात्र मुंबईत भगवे वादळ निर्माण होणार, यात शंका नाही. आर्थी लढाई आपण जिंकलो असून,

आता फक्त थोड़ी लढाई बाकी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, मी असेन किंवा नसेल, तुम्ही मात्र एकत्र रहा, का देत नाही, आपण घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

सकल मराठा समाजाच्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेला २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून सुरूवात झाली आहे. आज सोमवारी (दि. २२) रोजी ऐतिहासिक पारनेर तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर हे भगवे वादळ धडकताच पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले,

पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. पारनेर सकल मराठा समाजाच्या वतीने लापशी व मसाला भात महाभोजनाचे तर श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील मराठी बांधवांच्या वतीने नाष्टा व भोजनासाठी सुमारे ५१ स्टॉल लावण्यात आले. यामध्ये केळी, साबुदाना खिचडी, लापशी, मसाले भात, भाकरी, चपाती, मिरची, बेसण, दाळी आदींच्या गाड्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यादरम्यान संपूर्ण सुपा शहर भगवे झाले होते.

रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा महासागर उसळला होता. तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पुढील मुक्काम हा रांजणगाव गणपती, ता. शिरूर जि. पुणे येथे होणार असून, सायंकाळी उशिरा शिरूरच्या दिशेने पदयात्रेचे प्रस्थान झाले.

तो फलक ठरला लक्षवेधी

मनोज जरांगे पाटील यांचे सुपा देखील मैदानावर आगमन होण्यापूर्वी तरूण मराठा आंदोलकांच्या हातात ‘आमदार खासदार वाटत आहे चहा, हा तर मराठ्यांचा सोहळा आहे, जरा निरखून पहा’ हा फलक आंदोलनस्थळी लक्षवेधी ठरला.

आठ जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी

ऐतिहासिक पारनेर तालुक्यात मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील दाखल होताच सुमारे आठ जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दोन अप्पर पोलिस अधीक्षक, ८ पोलिस उपअधीक्षक, ३६ पोलिस निरीक्षक, ९८ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, ११८४ पुरुष पोलिस कर्मचारी, ५० महिला पोलिस कर्मचारी ४३ वाहतूक शाखेचे कर्मचारी, दोन आरसीपी प्लाटून, एक यूआरटी प्लाटून,

दोन एसआरपीएफ कंपन्या, एक सीआयएसएफ कंपनी, दोन बीडीडीएस पथके, असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

Ahmednagarlive24 Office