अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- काही वर्षांपुर्वी आकस्मिक निधन झालेले पत्रकार नंदू शिंदे यांच्या कुटुंबीयांना मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी भेट देऊन आर्थिक मदतीसह दिवाळी भेट दिली.
भाऊबीजच्या दिवशी दरवर्षी न चुकता ओवाळणी घेऊन येणार्या एका मुस्लिम भावास पाहून अनेकांचे मन भारावले. तर अनोख्या पध्दतीने साजरी करण्यात आलेल्या या भाऊबीज सामाजिक ऐक्याचा संदेश देऊन गेली.
मनपाच्या माजी जनसंपर्क अधिकारी निलिमाताई बंडेलू यांच्या हस्ते दिवंगत पत्रकार शिंदे यांच्या पत्नी दिपाली शिंदे यांच्याकडे साडी चोळीसह मदत सुपुर्द करण्यात आली.
यावेळी समीर मन्यार व शिंदे कुटुंबीय उपस्थित होते.नऊ वर्षापुर्वी पत्रकार नंदू शिंदे यांचे आकस्मिक निधन झाले. दिवंगत पत्रकार शिंदे यांनी विविध वृत्तपत्रात पत्रकारिता करीत असताना आपल्या कामाची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मनमिळावू स्वभावाचे व्यक्ती म्हणून त्यांची पत्रकारिता क्षेत्रात ओळख होती.
दिर्घ आजाराने त्यांच्या निधनानंतर दु:खाचा डोंगर शिंदे कुटुंबीयांवर कोसळला. या दु:खातून सावरण्यासाठी सर्व पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार दिला. मन्सूर शेख व मीनाताई मुनोत यांनी शिंदे यांच्या पत्नीस एका खाजगी शाळेत नोकरी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या नोकरीतून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यात आला. मात्र घरची परिस्थिती बेताची व दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च चालू असल्याने पत्रकारांच्या वतीने नेहमीच त्यांना मदतीचा हात दिला जातो. शिंदे कुटुंबीयांच्या कठिणप्रसंगी नेहमीच मदतीला धावून आलेले व दरवर्षी न चुकता भाऊबीजला मदत घेऊन येणार्या भावास पाहून शिंदे कुटुंबीय भारावले.
कठिण प्रसंगात मागे उभे राहिल्याने मोठा आधार मिळाल्याची भावना दिपाली शिंदे यांनी बोलून दाखवली. पतीच्या निधनानंतर दिपालीताई मोठ्या जिद्दीने नोकरी करुन आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहे. पितृछत्राची उणीव भासू न देता आपल्या दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्यासाठी घेत असलेल्या कष्टाचे निलीमा बंडेलू यांनी कौतुक केले.
मन्सूर शेख यांनी शिंदे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाच्या खर्चासह कुटुंबीयांसाठी यापुढे देखील सर्वपरीने मदत करण्याची भावना व्यक्त करुन शिंदे कुटुंबीयांच्या घरी भाऊबीज साजरी केल्यानंतरच खरी दिवाळी गोड झाल्याचा समाधान होत असल्याचे सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved