अहमदनगर बातम्या

माजी खा. तनपुरे यांचे महसूलमंत्र्यांना पत्र, राहुरीतील प्रशासकीय कार्यालये शहराबाहेर नेण्याचा घाट घालू नये !

Published by
Ahmednagarlive24 Office

राहुरी शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती शहराच्या बाहेर बिजगुणन प्रक्षेत्रावर बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते तालुक्यातून येणाऱ्या जनतेच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे असून ते बाहेर हलवू नये, अन्यथा या निर्णयविरुद्ध जनआंदोलन होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय प्रतिष्ठेचा न करता याचा फेरविचार व्हावा, असे पत्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिले आहे.

माजी खासदार तनपुरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की राहुरी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम राहुरी शहरापासून ४ कि. मी. अंतरावर असलेल्या बीज गुणन प्रक्षेत्राच्या जागेमध्ये करण्याचे शासनाने प्रस्तावित केलेले आहे.

राहुरी हे तालुक्याचे मुख्यालय असून याठिकाणापासून इतक्या लांबच्या अंतरावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यास व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांचा देखील तीव्र विरोध आहे.

वास्तविक राहुरी येथील सध्या असलेल्या तहसिल कचेरीसाठी ३.६० हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. या व्यतीरिक्त याठिकाणी वन विभाग, गृह विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, सार्वजिनिक बांधकाम विभाग, गृहरक्षक दल, पशुसंवर्धन विभाग या विभागांच्या नांवावर जागा आहेत. या सर्व जागांचे एकत्रीकरण केल्यास ही एकुण उपलब्ध होणारी जागा ४ हेक्टर पेक्षा अधिक आहे.

शासनाच्या सर्व विभागांसाठी प्रशासकीय इमारत होणार असल्याने प्रत्येक विभागास स्वतंत्र जागेची आवश्यकता नाही. अशा पध्दतीने सध्या अस्तित्वात असलेल्या जागेचे सात बारा सदरी एकत्रीकरण केल्यास या इमारत तालुक्याच्या मुख्यालयी बांधणे शक्य होईल.

परंतू शासनाने बीज गुणन प्रक्षेत्राच्या जागेमध्ये इमारत बांधण्याचे प्रस्तावित केले असल्याने या निर्णयास सर्वच स्तरामधून विरोध होत असून याबाबत जनतेकडून आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच राहुरी शहर हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्याचबरोबर याठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या असल्याने याच ठिकाणी इमारत बांधणे आवश्यक आहे.

शासनाने प्रस्तावित केलेल्या बीज गुणन प्रक्षेत्राच्या जागेऐवजी सध्या असलेल्या तहसिल कार्यालयाच्या ठिकाणीच नविन प्रशासकीय इमारत बांधण्याबाबत आवश्यक कार्यवाहीचे आदेश व्हावेत. असेही यावेळी तनपुरे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office