जिल्हाधिकारी कार्यालया जवळ माजी सैनिक व शेतकरी कुटुंबीयांचे उपोषण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- बंद करण्यात आलेल्या शेत जमिनीचा वहिवाटीचा रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या परिसरात माजी सैनिक व शेतकरी कुटुंबीयांनी उपोषण केले.

या उपोषणात सुनीलदत्त आंधळे, महाळसाबाई ठाणगे, प्रकाश खांडगे, मेजर संदीप लगड, शिवाजी कुंदार्डे आदी सहभागी झाले होते. उपोषण कर्त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, कामरगाव (ता. नगर) येथे स्वतः मालकीची शेत जमीन असून, या जमीनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. कामरगाव येथे गट नंबर 728, 729, 749 मध्ये शेत जमीन आहे.

सदर शेत जमिनीत जाण्याकरिता रस्ता हा गट नंबर 724 मधून जात आहे. हा रस्ता वर्षानुवर्षे सुरू असून, तेथून वहिवाट चालू होती. परंतु सदर रस्ता येथील गट मालक गौतम बाबुराव शिंदे व अशोक शंकर शिंदे (मयत) यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता 3 जानेवारी रोजी अचानक बंद केला आहे.

त्यामुळे आमच्या जमिनी गेल्या 9 महिन्यापासून ओसाड पडल्या आहेत.सदर प्रश्‍नी नगर तहसीलदार यांना रस्ता बंद केल्या बाबत लेखी तक्रार केली होती. या अर्जावर दखल घेऊन सदर रस्त्याची पाहणी तहसीलदार यांनी 28 फेब्रुवारी रोजी केली. सदर पहाणी झाल्यानंतर 29 फेब्रुवारी रोजी सदर शेतमालक शिंदे यांनी तहसीलदारांनी पाहणी केल्याचा

राग येऊन आमच्या शेतात येऊन सदर रस्त्याने अजिबात जायचे नसल्याचे सांगून शिवीगाळ करीत मारहाण व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यास धमकावण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक्षक, आमदार निलेश लंके व तहसीलदार यांना याबाबत लेखी पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

तहसीलदारांनी सदर शेत मालकास रस्त्याच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास बजावले होते. तरी देखील सदर शेतमालक उपस्थित राहिले नाही. ऑनलाईन निकालाची प्रत मिळाली असता शेत मालकाच्या जमीनीतून रस्ता दाखवता येत नसल्याचे नमुद करण्यात आले.

सदर रस्ता त्या गटा पुरता दिसत नसून, आजही त्या गटाच्या मागे व पुढे रस्ता असतित्वात असल्याचे म्हंटले आहे. सदर बंद करण्यात आलेला शेत जमिनीचा वहिवाटीचा रस्ता खुला करुन देण्याची मागणी माजी सैनिक व शेतकरी कुटुंबीयांनी केली आहे.

अन्यथा इच्छामरणाची परवानगी देऊन मृत्यूनंतर शेत जमिन व घरादाराचा लिलाव करून त्यातून मिळणारी रक्कम हे भारतीय सेनेला पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24