अहमदनगर बातम्या

माजी सैनिकास 18 लाखांना ऑनलाईन गंडा; आरोपी मुंबईत जेरबंद

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकास 18 लाख 39 हजार रूपयांना ऑनलाईन गंडा घालणारा आरोपी सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 52 रा. गणेशनगर, वेल्फेअर सोसायटी, कांदिवली, मुंबई) याला सायबर पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली.

त्याला नगर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोणी येथील फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे.

ते ‘वर्क फॉर्म होम’ करता येईल अशा नोकरी, उद्योगाच्या शोधात होते. ऑनलाईन साईटवर माहिती घेत असताना त्यांची फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली. तीने फिर्यादी यांना ‘शॉपिंग डॉट कॉम’ कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्‍वास संपादन केला.

कंपनीचे उत्पादने खरेदी केल्यास व विकल्यास तुम्हाला भरपुर कमिशन मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले. पैसे जमा करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून एक क्यूआर कोड पाठविला. त्याद्वारे फिर्यादी यांची एकुण 18 लाख 39 हजार 702 रूपयांची फसणूक झाली आहे.

दरम्यान फिर्यादी यांनी 10 जानेवारी 2022 रोजी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल केला होता.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी,

पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिंगबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषण करून आरोपी खान याला मुंबई येथून अटक केली.

Ahmednagarlive24 Office