Ahmednagar News : नगर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे, संचालिका सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, गोल्ड व्हॅल्युअर संजय बोरा, मॅनेजर रविंद्र शिंदे या पाच जणांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. नाईकवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तर इतर संचालकांना पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावल्याने पारनेर तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
वाफारे यांनी पहिली शाखा व मुख्यालय नगरच्या चितळे रोड येथे मोठा गाजावाजा करत दिवंगत मंत्री गोविंदराव आदिक यांच्या हस्ते सुरु केली. तद्नंतर वाफारे यांनी पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने जिंकली देखील.
तालुक्यातील हुशार पुढारी म्हणून वाफारेंचे नाव गाजू लागले. २० वर्षापुर्वी शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी जवळपास निश्चित होती व उमेदवारी मिळाली असती, तर वाफारे आमदार ही झाले असते. परंतू कुठेतरी माशी शिंकली अन् विजय औटी यांनी उमेदवारी मिळवून सलग पंधरा वर्षे आमदारकी गाजवली.
वाफारे हे दिवंगत माजी आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांच्या तालमीत राजकीय कसरती शिकून तालुक्यातील तेल लावलेला पुढारी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यावेळेस त्यांच्या सोबतीला तालुका युवक काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष व संपदा पतसंस्थेचे दिवंगत अध्यक्ष बाळासाहेब सुंबे यांची जोडी चंगू मंगू म्हणून प्रसिद्ध होती.
सुंबे यांचे कालांतराने आजाराने निधन झाले अन् वाफारेंचा आधार गमावला. जर आज सुंबे असते तर ना संपदा पतसंस्था बुडाली असती, ना वाफारे, वा इतर जेल गेले असते. वाफारेंची भाषण शैली अफलातून होती. राजकीय भवितव्य उज्ज्वल होते. संपदा पतसंस्थेची स्थापना केली, लोकांच्या पैश्यावर संस्था सुरळीत चालू असताना आर्थिक अंदाधुंदी केली.
सोने तारण करताना खोटे सोने तारण ठेवून मोठ मोठाली कर्जे उचचली, त्यात गोल्ड व्हॅल्युयर संजय बोरा ही सहभागी झाल्याने व्याप्ती वाढली. सहयांचा अधिकार असलेला मॅनेजर रविंद्र शिंदे ही सहभागी झाला.
परिणामी यांच्या बरोबर सर्व संचालक या घोटाळ्यात सहभागी झाल्याने त्यांना ही न्यायाल्याने शिक्षा सुनावल्याने पारनेर तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नुकताच पारनेर तालुक्यातील काही पतसंस्था अखेरच्या घटका मोजतायेत.
पण यात ज्यांचे पैसे ठेवींच्या रुपाने अडकले, त्यातील मोठे मासे यांनी आपापल्या ठेवी अलगद काढून घेतल्या. मोठ्या कर्जदारांनी ही आपापली कर्जे ठेवीदारांच्या पैश्यांवर डोळा ठेवून निम्या पैश्यांच्या बदल्यात मिटवून टाकले.
डबघाईस आलेल्या या व इतर संस्थांचे एक ही चेअरमन, संचालक ठेवीदारांना भेटत ही नाही, प्रत्यक्ष संपर्क ठेवत नाही वा फोन वरही भेटत नाही. पण वाफारेंना झालेल्या शिक्षेवरून सहकारी पतसंस्थांचे पदाधिकाऱ्यांना हादरा बसला आहे तर ठेवीदारांना आनंद झाला आहे.