Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा संपूर्ण भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे. घराघरांत, बाजारपेठांत सगळीकडे भगवे झेंडे आहेत. अनेक ठिकाणी मंदिरे साफसफाई करण्याचे तसेच अनेक ठिकाणी नैवद्य बनवण्याचे काम सुरु आहे. निमित्त आहे उद्याचे.. उद्या २ तारखेला सोमवारी देशभर उत्सव साजरा होईल, अयोध्यात श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हा उत्साह आहे.
उद्या अहमदनगर जिल्ह्यात आणखी विक्रम होणार आहे. या सोहळ्यानिमित्त नगर जिल्ह्यात तब्बल २१ लाख लाडूंचा नैवेद्य श्रीराम चरणी अर्पण केला जाणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महिन्याभरापासून दक्षिणेतील सात मतदारसंघात घरोघरी चार किलो साखर व एक किलो डाळ वाटप केली. यातून घरोघरी हरभरा डाळीचे लाडू तयार करण्यात येणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी यातून तब्बल २१ लाख लाडूंचा नैवेद्य श्रीराम मंदिरात दाखवण्यात येणार आहे.
बाजारपेठ भगवीमय
या उत्सवामुळे नगर शहरातील बाजारपेठ देखील भगवीमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहक भगवे झेंडे व श्रीरामांचे छायाचित्र खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. शहरातील विविध मंदिरांवरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या बाजारात नजर मारली तरी सगळीकडे भगवे वातावरण दिसत आहे.
शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे वातावरण असणार आहे. सोमवारी प्रत्येक मंदिरासमोर रांगोळी असेल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्ट आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील गौरी घुमट येथील तुळजाभवानी माता मंदिरात या सोहळ्यानिमित्त श्रीराम दरबार हा देखावा करण्यात येणार आहे. जय दुर्गे जागरण मंडळाच्या वतीने प्रभू रामचंद्र सत्संग व किर्तन, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण, महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. जिल्हाभरातही अनेकग्रामाईं भागांत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.