अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी २००३-०४ साली कोपरगावसाठी तालुका क्रीडा संकुल मंजूर करून केले व स्वत:च्या संस्थेची सहा एकर जागा क्रीडा संकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली.
मात्र याची जाणिव न ठेवता विद्यमान आमदार हे क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू पाहत असल्याचा आरोप संजीवनी फाऊंडेशनचे सचिव व युवा नेते सुमित कोल्हे यांनी एका स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केला.खेळाडूंच्या भवितव्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हे म्हणाले, सर्वांनीच मागील पाठपुराव्याची व सत्य परीस्थितीची माहिती घेणे गरजेचे आहे. ज्या जागा भविष्यातील उपसंकुलासाठी आमदार सांगत आहे,
त्या जागा तांत्रिक अडचणी, पुरेशा नसल्यानेच व शहरालगत कोणी जागा देण्यास तयार नसल्या कारणाने माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्वत:च्या अधिपत्याखालील संजीवनी कृषी,शैक्षणिक व ग्रामिण विकास संस्था या संस्थेची ३ एकर ३६ गुंठे जागा उपलब्ध करून दिली.
मात्र या जागेत ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक व्यवस्थित बसत नसल्याने संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेने २ एकर क्षेत्र क्रीडा संकुलासाठी दिले.
अशी एकूण सुमारे ६ एकर जागा दिली. एवढेच नव्हे तर शासनाने दिलेल्या रू २५ लाख निधीत अपेक्षित क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होत नाही असे लक्षात येताच संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने रू १४ लाखांचा अधिकचा निधी देवून काम पूर्ण केले.
विद्यमान आमदार अनेकदा उपसंकुल उभारण्याची भाषा करतात. खरे तर आपल्या तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उपसंकुल निर्माण झाले तरी हरकत नाही, आपल्या सर्व खेळाडूंना पुढे जाण्यास मदतच होईल.
मात्र येणारा निधी इतरत्र उपसंकुलाच्या नावाखाली पळविण्यापेक्षा त्यातून सध्याच्या तालुका क्रीडा संकुलात प्रेक्षकांसाठी अद्ययावत आसन व्यवस्था व आधुनिक क्रीडा साधने उपलब्ध करून देणे उपयुक्त ठरेल. त्यासाठी क्रीडाप्रेमींना बरोबर घेवून आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करीतच आहोत.
आपल्या तालुक्यातील सर्वच खेळाडू व त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आम्ही निश्चितच सर्व क्रीडा प्रेमींसोबत आहोत. त्यामुळे इतर कोणी जिव्हाळा दाखविण्याच्या नावाखाली क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू नये,असे कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे