‘ऐनी डेस्क’ अ‍ॅपचा वापर पडला महागात; नोकरदाराला सव्वा दोन लाखांना गंडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- ‘ऐनी डेस्क’ आणि ‘टिम व्हीवर’ या दोन अ‍ॅपद्वारे अनेकांची फसवणूक होत असून त्यात सर्वसामान्यांसह नोकरदार व्यक्तीही सायबर पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत.

मोबाईलवर ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा अ‍ॅक्सेस दुसर्‍याला देणे एका नोकरदाराला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या खात्यातून दोन लाख 23 हजार 499 रूपये काढून घेतले.

संदीप रामभाऊ आंधळे (वय 47 रा. साईदीपनगर, पाईपलाईनरोड, सावेडी) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे. आपली फसवणूक झाल्याचे आंधळे यांच्या लक्षात येताच त्यांनी येथील सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

त्यांना आलेल्या फोनवरील (918926164436) अज्ञात व्यक्तीविरूध्द सायबर पोलिसांनी भादंवि कलम 420 सह आयटी अ‍ॅक्ट कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

संदीप आंधळे यांना 918926164436 या नंबरवरून फोन आला होता. एसबीआय कस्टमर केअरमधून बोलतोय, असे सांगून समोरच्या व्यक्तीने आंधळे यांचा विश्‍वास संपादन केला.

त्या व्यक्तीने आंधळे यांना मोबाईलमध्ये ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. आंधळे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड केले. त्या व्यक्तीने आंधळे यांना अ‍ॅपमध्ये काही माहिती भरण्यास सांगितली.

आंधळे यांनी समोरच्या व्यक्तीवर विश्‍वास दाखवित सांगितलेली माहिती भरली. आंधळे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्यांनी समोरच्या व्यक्तीला सांगितला. यामुळे आंधळे यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस त्या व्यक्तीकडे गेला.

त्यानंतर त्या व्यक्तीने आंधळे यांना त्यांच्या बँक खात्याचा युझरआयडी व पासवर्ड टाकण्यास सांगितले. तसेच एटीएम कार्डची माहिती भरण्यास सांगितले. समोरच्या व्यक्तीवर विश्‍वास ठेवत आंधळे यांनी त्याने सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती अ‍ॅपवर भरली.

त्या व्यक्तीकडे आंधळे यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस गेल्यामुळे त्याच्याकडे आंधळे यांच्या बँक खात्याची सर्व माहिती गेली होती. त्या माहितीच्या आधारे आंधळे यांच्या खात्यातील दोन लाख 23 हजार 499 रूपये त्या व्यक्तीने काढून घेतले.

आपली फसवणूक झाली असल्याची बाब आंधळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.