अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या स्फोटात संबंधित कुटुंबियांचा संसार जाळून खाक झाला आहे.
दरम्यान हि धक्कादायक घटना राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड हायवे लगत असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या श्रीदत्त वसाहतीमध्ये एका घरात घडली आहे.
आज (शनिवारी) पहाटे साडेचार वाजता गॅसच्या भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला. या अग्नितांडवात एका नवीन दुचाकीसह घरातील चारही खोल्यांमधील लाखो रुपये किंमतीच्या चीजवस्तू,
कपडे, किराणा, अन्नधान्य, महत्वाची कागदपत्रे व इतर सामानांची राखरांगोळी झाली. याबाबत अधिक माहिती अशी कि, अशोक आत्माराम पाटील (रा. श्रीदत्त वसाहत, राहुरी खुर्द) यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्नितांडव घडले.
ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभागात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. तर त्यांच्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत. पाटील हे मंदिरात तर उर्वरित कुटुंब घरीच होते. मात्र प्रसंगावधानतेमुळे ते बालंबाल बचावले.