अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- रूग्णाच्या कोरोना टेस्ट न करताच कोरोनाची आरटीपीसीआर ही टेस्ट करून कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे बनावट रिपोर्ट देऊन रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक केली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विळद घाट येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि.या लॅबच्या अधिकारी व टेक्नीशियन अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची संस्था ही डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. याबाबत सविस्तर असे की,
बबन खोकराळे यांना घशात त्रास होत असल्याने त्यांना नगर मधील एका कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांच्या कोरोनाच्या विविध टेस्ट विळद घाट येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि.या लॅबमार्फत करण्यात आल्या. यात आरटीपीसीआर ही टेस्ट दोन वेळा केल्याचे दाखवून ते पॉझीटिव्ह असल्याचा रिपोर्ट दिला.
दरम्यानच्या काळात खोकराळे यांच्यावर बालिकाश्रम रोडवरील एका खासगी रूग्गालयात उपचार सुरू होत.परंतु उपचारादरम्यान यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.त्यानंतर त्यांच्या मुलाने एलआयसीसाठी त्यांच्यावर केलेल्या ट्रीटमेंटची फाईल संबंधित रुग्णालयातून घेूवन ती ओळखीच्या डॉक्टरांना दाखवली असता त्यांनी यात काहीतरी गडगड असल्याचे सांगितले.
त्यावरुन अशोक खोकराळे यांनी मुख्यमंत्री,आरोग्यमंत्रालय कार्यालयात याबाबत तक्रार केली.त्यानुसार अहमदनगर मनपा आयुक्तांसमोर सुनावणी झाली.यावेळी संबंधित उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी संबंधित टेस्ट केलेले रिपोर्ट सादर केले नाहीत. याप्रकरणी मनपाच्या मान्यताप्राप्त कोविडसेंटरमध्ये चौकशी केली असता तशी टेस्ट केली नसल्याचे समोर आहे.
याबाबत नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी फिर्यादी व त्यांचा भाऊ हे दोघेजन विळद घाट येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि.या लॅबच्याकार्यलयात जावून त्यांनी खोकराळे यांच्या टेस्टचे रिपोर्ट व पैसे भरलेली पावती मागीतली. यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी ती पावती यापूर्वी दिली असून परत हवी असल्यास डुप्लीकेट शिक्का मारलेली मिळेल असे सांगितले.
ती पावती घेत त्यावरील मजकुराचे निरीक्षण केले असता त्यावर रुग्णाचा मोबाईल नंबर दोन्ही पावत्यांवर वेगवेगळे असल्याचे दिसले. त्यावर संपर्क केला असता त्या दोन्ही व्यक्तींनी नगरमध्येच कोरोनाचे उपचार घेतले असून आता बरे असल्याचे सांगितले.
त्यावरून संबंधित लॅबच्या अधिकारी व टेकनीशियनने स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचे रिपोर्ट देवून फसवणूक केल्याचे समोर आले.याप्रकरणी अशोक बबनराव खोकराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि.या लॅबच्या संबंधित अधिकारी व टेक्निशीयन अशा दाघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.