अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरणी 21 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात बँकेचे शाखाधिकारी प्रवीणकुमार पाराजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलसांनी आज दुपारी दहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना उद्या (सोमवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 पैकी तब्बल 134 कर्जदारांचे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने सत्यता पडताळणीत बनावट आढळले आहे. 57 कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे 50 लाख रुपयांची वसुली झाली.
बनावट सोने गहाण ठेवलेल्या 134 कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोनगावचे शाखाधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिल्या टप्प्यात 20 कर्जदारांसह सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे, सोनगाव सात्रळ पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे पुढील तपास करीत आहेत. दहा जणांना अटक मात्र काही जण फरार संदीप बाळासाहेब अनाप, दिगंबर धोंडीबा जाधव, राजेंद्र भाऊसाहेब थोरात, भास्कर भाऊसाहेब अंत्रे, ज्ञानदेव पंढरीनाथ शिंदे, दत्तात्रेय तुकाराम शेळके (सर्वजण रा. सोनगाव), शिवाजी लक्ष्मण अनाप,
प्रेमकिरण संपतकुमार डुकरे, संजय रखमाजी बेल्हेकर, अविनाश आबासाहेब नालकर, अक्षय तुकाराम गडगे, दत्तात्रेय विठ्ठल सिनारे, सचिन तुकाराम निधाने (सर्वजण रा. सात्रळ), गणेश कैलास वांदे (कोल्हार बु.), राजेंद्र शिवाजी हारदे (रा. तिळापूर), मुनीफ अब्दुल शेख (रा. पाथरे बु.),
संदीप हरिभाऊ सजन (रा. अनापवाडी), नवनाथ गोपीनाथ पठारे (रा. रामपूर), शिवाजी संपत संसारे (रा. निंभेरे), दत्तात्रेय विठ्ठल वाणी (रा. झरेकाठी) अशी आरोपींची नावे आहेत. पैकी दहा आरोपींना पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले आहे.
इतर दहा जण पसार आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन काहींना अटक झाल्याने कर्जदारांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. बनावट सोनेतारण प्रकरण चव्हाट्यावर येताच सोनगाव-सात्रळ परिसरातील काही प्रतिष्ठितही पसार झाल्याची चर्चा आहे.