राहाता तालुक्यातील वाकडी येथील गणेशनगर रोड जाधव वस्ती येथील आदिनाथ भास्कर जाधव (वय ३८) या शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन मुत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे वाकडी परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वाकडी – गणेशनगर रोडवर असलेल्या जाधव वस्ती भागात राहणारा अल्पभूधारक शेतमजूर आदिनाथ भास्कर जाधव हा शुक्रवारी (दि. २४) दुपारनंतर घरी न आढळल्याने त्याच्या घरच्यांनी व भावकितल्या लोकांनी संध्याकाळी सर्वत्र शोध घेतला.
नंतर तो चोळकेवाडी येथे असलेल्या बहिणीकडे गेला की काय याची चौकशी केली असता तिथे नसल्याने व त्याचा मोबाइल बंद असल्याने त्या रात्री आदिनाथचे संपूर्ण कुटुंब रात्रभर चिंताग्रस्त होते. दुसऱ्या दिवशीही शोध कार्य पुन्हा सुरु केले असता
शनिवारी (दि. २५) दुपारी चार वाजेच्या सुमारास चुलत भाऊ आण्णासाहेब जाधव हे शेतातील मोटार बंद करण्यासाठी गेले असता सदर विहिरीत आण्णासाहेब यांनी पाण्याची पातळी पाहण्यासाठी डोकावले असता त्यांना आदिनाथ याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला.
त्यांनी तात्काळ सरपंच डॉ. संपतराव शेळके व पोलीस पाटील मच्छिंद्र अभंग यांना घटनेची माहिती दिली. तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर आदिनाथ जाधव यांचा मृतदेह स्थानिकांनी वर काढला.
शवविच्छेदनानंतर सोशल डिस्टन्स पाळत शोकाकूल वातावरणात जाधव वस्ती येथे रात्री दहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत आदिनाथ पश्चात आई, वडील, पत्नी, तेरा वर्षाची मुलगी पायल, अकरा वर्षाचा मुलगा ओंकार असा परिवार आहे.
आदिनाथच्या घरची परिस्थिती अतिशय नाजुक आहे. तो एकुलता एक असल्यामुळे घरातला कमवता व्यक्तीच सोडून गेल्यामुळे या परिवारावर मोठी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.
आदिनाथ जाधव यांना स्वत:ची विहीर नसल्यामुळे जनावरांसाठी व शेतातील चाऱ्यासाठी शेजारील चुलत भाऊ यांच्या विहिरीतील पाणी ते वापरत असत. घटना घडली त्या दिवशी मयत आदिनाथ विहिरीवरील असलेल्या सायपनचे नट बोल्ट व पाइप जोडताना तोल जाऊन पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
मयत आदिनाथ यांचा मृतदेह विहिरीतून वर काढला असता त्यांच्या अंगात फक्त अंडरवियर होती. घटना घडली ते ठिकाण घरापासून हाकेच्या अंतरावर असून या विहीर भोवती सहा ते सात फुट उंच वाढलेली मका पिक आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे.