Ahmednagar News : अळकुटीत भल्या सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी संतोष बबन नरड (वय २७), गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अळकुटी येथील बहिरोबा वाडीच्या पोज वस्तीवरील शेतकरी संतोष बबन नरड हे आपल्या पाळीव जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असता, अचानक बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांचे पाय, हात, बोटे, डोके, कंबरेवर चावा घेतल्याने प्रचंड रक्तश्राव झाला. या वेळी त्यांच्या एका हातात चारा कापण्यासाठीचा विळा होता तर दुसऱ्या हाताने त्यांनी बिबट्याला ठोसे मारून प्रतिकार केला.
त्यांच्या बरोबर शेतकरी असलेला त्यांचा लहान भाऊ कृष्णा बबन नरड हे होते. बिबट्याच्या हल्ल्याने तेही घाबरले; परंतू प्रसंगावधन राखून त्यांनी मदतीसाठी धावा केल्याने बिबट्याने पळ काढला. त्यामुळे हे दोन्ही शेतकरी बालंबाल बचावले.
पारनेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. यावेळी भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य किसनराव शिंदे यांनी, या परिसरात बिबट्या व इतरही हिंस्त्रप्राण्यांचे वास्तव्य असून, मनुष्यावर हल्ला झाल्याने वनविभागाने त्वरीत पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.