Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी येथे चार पिल्लांसह वास्तव्य असलेल्या बिबट्याने पानसरे यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केल्याची घटना दि. २ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
वाकडीतील पानसरे वस्तीवरील शेतकरी सचिन सुभाष पानसरे सकाळीच जनावरांचा चारा आणण्यासाठी सकाळीच शेतात गेले होते. येथे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांची व बिबट्याची चांगलीच झटापट झाली.
यात तरुण शेतकरी चांगलाच जखमी झाला. बिबट्यासोबत त्याचे चार बछडेदेखील होते. कदाचित या बछड्यांमुळे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पानसरे त्यांचा ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले होते. चारा काढून झाल्यावर शेजारीच असलेल्या ट्रॅक्टरमध्ये एक एक पेंढी ते टाकत असताना शेजारील गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
सुमारे दोन मिनिटांच्या झटापटीनंतर सचिन यांनी आपली सुटका करुन वस्तीकडे धाव घेतली. या झटापटीत त्यांच्या डोक्यावर जखम झाली असून हाताच्या दंडाला दात लागले आहेत. त्यांना प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगर येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
सध्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. वन्यप्राणी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत बघून लोकवस्तीजवळ निवारा करत आहेत. याच भागात एक वर्षापूर्वी दोन बिबट्याची झुंज होऊन दोन्ही बिबट्यांनी आपले प्राण गमावले होते.
या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले असताना बिबट्याची दहशत अजूनही या भागात असल्याचे दिसत आहे. या संर्दभात वनविभागास माहिती कळवली असून तात्काळा पिंजरा बसवण्यात येणार आहे, अशी माहिती समजली आहे.
वाकडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य अनेक महिन्यांपासून असताना वन विभाग सुस्त अवस्थेत आहे. अनेक शेतकऱ्यांवर हल्ले झाले असताना वन विभाग अजूनही पिंजरा लावण्यस तयार नाही. बिबट्याच्या हल्ल्यात एखादा शेतकरी दगावला तर यास वन विभाग जबाबदार राहुल का ? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.