शिर्डी-सिन्नर महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा संताप, मोबदल्याशिवाय काम होऊ देणार नाही

Published on -

Shirdi-Sinnar Highway : शिर्डी-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग (NH-160) चे काम अंतिम टप्प्यात असताना, झगडे फाटा येथे उड्डाण पुलाच्या निर्मितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरे बाधित झाली आहेत. मात्र, त्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही. जर लवकरात लवकर नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई देण्यात आली नाही, तर महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी दिला आहे.

तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला मोबदला

गेल्या तीन वर्षांपासून हा महामार्ग प्रकल्प सुरू असून, कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील झगडे फाटा परिसरात अनेक रहिवाशांच्या घरांना आणि शेतजमिनींना फटका बसला आहे. बाधित कुटुंबांना सरकारी मोबदला देण्यासाठी मोजणी प्रक्रियाही सुरू आहे, मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अधिकारी त्यात अडथळे आणत आहेत.

अधिकाऱ्यांची मनमानी आणि अटींमुळे त्रस्त नागरिक

सरकारी मोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतरही बाधित कुटुंबांना विविध जाचक अटी लावून मोबदला मिळू दिला जात नाही. या संदर्भात माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, आणि ते या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जमिनींना मोठी किंमत

झगडे फाटा परिसरात सध्या ५ ते ६ लाख रुपये प्रति गुंठा भाव आहे. अनेक कुटुंबांनी जमिनी विकत घेऊन घरे बांधली आहेत. मात्र, महामार्गाच्या कामामुळे या कुटुंबांवर घर गमावण्याची वेळ आली आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे मोबदल्याविना अनेक नागरिक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

आंदोलनाचा इशारा

बाधित शेतकरी आणि रहिवाशांना योग्य मोबदला दिला गेला नाही, तर महामार्गाचे काम रोखण्यात येईल, असा थेट इशारा केशवराव होन आणि चांदेकसारे सरपंच किरण होन यांनी दिला आहे. बाधित कुटुंबांना एकत्र घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, अशी घोषणाही करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe