अहमदनगर बातम्या

सततच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त, वापसा होत नसल्याने मशागतीची कामे रखडली !

Published by
Ahmednagarlive24 Office

पावसाची सारखी रिपरिप सुरू असल्याने खरीप पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढीस लागल्याने त्याची मशागत करतांना दमछाक होत आहे. हे तण काढताना शेतमजूरांनाही अडचण येत असल्याने बहुतांश शेतकरी तणनाशकांची फवारणी करताना दिसत आहेत.

सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील मूग, मका, सोयाबीन, तूर, बाजरी आदि पिकांमध्ये तणांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, यामुळे मशागत करताना शेतकरी त्रस्त झाले आहेत. यंदा मृगाचा पाऊस चांगला झाला असून, यंदाचा पावसाळा अनुकूल असल्याने खरीप हंगाम तरारला आहे.

पिकांची वाढ जशी जोमाने होत आहे, तशीच तणांचीही वाढ होत आहे, परिणामी शेतकरी शेतमजूरांना काम करता येत नाहीत फवारणी, निंदणी, कोळपणी, आंतर मशागतीची कामे रखडली आहेत. परिणामी शेतकरी आता तणांच्या बंदोबस्तासाठी तणनाशकांचा वापर करत आहेत.

त्यामुळे जमिनीचा पोत जरी खालावत असला तरी हाती आलेले उत्पन्न व लागणारी मजुरी यांचा कुठेतरी ताळमेळ बसण्यासाठी शेतकऱ्यांसमोर दुसरा मार्ग नाही, तर पावसाच्या रिपरिपमुळे काही जमिनी उपाळल्या असून, काही शेतात पाणी साचल्याने त्यातील पिके आता पिवळी पडून लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

महिनाभरापासून सूर्यदर्शन नाही व पाऊस सुरुच आहे. शेतातील जमिनीला वापसा होत नसल्याने शेतकऱ्यांची अंतर्गत मशागतीची कामे रखडली आहेत. खुरपणीची कामे रखडल्याने शेतकरी पिकांवर तणनाशकाची फवारणी करत आहेत, पण त्यात सुद्धा पावसाचा अडथळा येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office