Ahmednagar News : सध्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. निवडणुकीचा ज्वर शहारासह ग्रामीण भागात चढत आहे; मात्र अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या व निळवंडेच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या नजरा पाण्याचे आवर्तन केव्हा सुटेल याकडे लागल्या आहेत.
राहाता तालुक्यातील वाकडी, लाडेवाडी, धनगरवाडी, चितळी येथील शेतकरी चातकाप्रमाणे सध्या पाट-पाण्याची वाट पाहत आहे. निवडणुका होतील पण पाण्याचावून जनावरांचे हाल होत आहेत. हिरवा चारा वाळून चालला आहे.
त्यामुळे कॅनॉलला पाणी सोडा, अशी साद लाभधारक शेतकरी घालीत आहे. वाढत्या उष्णतेच्या झळा, मागील वर्षीचे अल्प पर्जन्यमान परिणामी पाणीसाठवण तलाव, विहीर, गावतळे, कूपनलिका केव्हाच कोरडेठाक पडले आहे.
रखरखत्या उन्हाने जमीन रोज तापत असल्याने, जेमतेम शिल्लक असलेली जनावरांची चारा पिके करपत आहे. नागरिकांच्या पिण्याचा व जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न जटील झाला असल्याने शेतकरी कासावीस झाला आहे.
त्यामुळे निळवंडे धरणातून पाणी लवकरात लवकर सुटण्याच्या तारखा जाहीर करून टेल टू हेड पाणी देऊन उपलब्ध असलेले गावतळी, बंधारे, साठवण तलाव आदी भरून दिल्यास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल व पशुधनाचा चारा व पिण्याचा पाणी प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास हातभार मिळेल.
■टेल ट् हेड प्राधान्य द्यावे
निळवंडेचे पाणी सुटल्यास सर्वप्रथम टेलला असलेल्या गावांपासून विविध बंधारे, साठवण तलाव भरून देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.