अहमदनगर : शेतकऱ्याच्या लेकीची गगन भरारी; कठोर मेहनतीतून मिळवले MPSC मध्ये घवघवीत यश

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शेतकऱ्याची मुलं आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या कार्याचा आणि कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. एमपीएससी सारख्या खडतर परीक्षांमध्ये देखील आता शेतकऱ्यांच्या मुलांनी बाजी मारली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एमपीएससी क्रॅक करणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा मोठा वाटा पाहायला मिळत आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या एका शेतकरी बापाच्या लेकीने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत सहाय्यक अभियंता पदाला गवसणी घातली आहे. यामुळे सध्या कोपरगावच्या या लेकीची संपूर्ण राज्यभर चर्चा पाहायला मिळत आहे.

तालुक्यातील चांदेकसारे या गावातील शेतकरी कुटुंबातील स्वाती नामदेव होन यांनी कठोर मेहनत घेऊन एमपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. स्वाती यांची एमपीएससीतून सार्वजनिक बांधकाम विभाग येथे सहाय्यक अभियंता या पदावर निवड झाली आहे. त्यामुळे सध्या या शेतकरी लेकींवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

स्वाती यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण राधाबाई काळे विद्यालयात झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी एसएसजीएम महाविद्यालयात घेतले. पुढे मग त्यांनी संजीवनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

सिव्हिल इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना एका नामांकित खाजगी कंपनीत काम करण्याची संधी देखील उपलब्ध झाली. मात्र, त्यांना खाजगी कंपनीत काम करायचे नव्हते. त्यांना अधिकारी बनून आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे पांग फेडायचे होते. मग काय त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. कोरोना काळात त्यांनी घरातूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला.

दरम्यान, स्वातीने 2023 मध्ये एमपीएससीने घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत नेत्र दीपक अशी कामगिरी केली आणि सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट हे मानाचे पद मिळवले. अ

शा तऱ्हेने स्वाती यांनी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येत आपल्या मेहनतीच्या जोरावर एमपीएससीमधून सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट पदाला गवसणी घालून आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. यामुळे सध्या स्वाती यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे. स्वाती यांची कामगिरी इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe