अहमदनगर बातम्या

शेतकऱ्याचे विद्युत मोटार व स्प्रिंकलरचे साहित्य लंपास : यापूर्वीही त्याच शेतकऱ्याची केली होती चोरी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहे. पावसामुळे आता पिकांना पाणी देण्याची आवश्यता नसल्याने विहिरीतील मोटारी सध्या बंदच असतात. याच संधीचा भुरट्या चोरटयांनी फायदा घेत शेतकऱ्यांचे शेतात असलेले साहित्य लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील बंदिस्त कुक्कुटपालन शेडचे कुलूप तोडून चोरट्यांनी विद्युत मोटार व स्प्रिंकलर साहित्य लंपास केले. सदरील घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सोमवारी शेवगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बोधेगाव येथील गोकुळ काकासाहेब घोरतळे (वय ३८) यांची सोनविहीर फाट्यानजीक शेवगाव गेवराई मार्गालगत शेतजमीन आहे. या शेतात पाण्यासाठी एक विहीर आहे.

काही दिवसांपूर्वी विहिरीवर सौरऊर्जा प्लेट मंजूर झाल्याने त्या विहिरीवरील एक ३ एचपी विद्युत मोटार व पिकांना पाणी देण्यासाठीचे नवीन पितळी स्प्रिंकलर त्यांनी एका पेटीत कुलूपबंद असलेल्या कुक्कुटपालनच्या शेडमध्ये ठेवले होते.

शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंदिस्त शेडचे कुलूप तोडून त्यातील अंदाजे ५ हजार रुपये किमतीची एक सिल्व्हर रंगाची ३ एचपीची विद्युत मोटार व ५ हजार रुपये किमतीचे नवीन पितळी स्प्रिंकलरचे आठ नग लंपास केले.

गोकुळ घोरतळे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काही कामानिमित्त शेतात गेले असता त्यांना शेडचे कुलूप तुटलेले दिसले. शेडमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना तेथील विद्युत मोटार व स्प्रिंकलर आढळून आले नाही.

त्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या मजुरांच्या मदतीने गायब झालेल्या साहित्याचा आजूबाजूला शोध घेतला. परंतु, सदरील साहित्य कुठेही आढळून आले नाही.

दरम्यान काही वर्षांपूर्वी येथील विहीर व बोअरवेलमधून तीन विद्युत मोटारी, केबल, पाईप व कुक्कुटपालनचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. याच ठिकाणी पुन्हा दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने शेतकरी कुटुंबीय धास्तावले आहेत.

Ahmednagarlive24 Office