अहमदनगर बातम्या

शेतकरी शेतात अन चोरटे घरात: भरदिवसा घरफोडी करत रोख रक्कम व दागिने लंपास

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : यंदा मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावलीआहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागातील सर्वजण शेतीच्या कामात व्यस्त झालेले आहेत.

त्यामुळे दिवसभर घराला कुलूप लावून सर्वजण शेतातील कामे करत आहेत. मात्र भुरटे चोरटे नेमका याच संधीचा फायदा घेत. भरदिवसा घरफोडी करत असून मोठा मुद्देमाल लंपास करत आहेत.

असेच शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडत सोन्याचे दागिने व मोबाईल असा ५० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील देहरे गावच्या शिवारात घडली आहे.

याबाबत संजय नामदेव काळे (रा. घोगरदरा, देहरे, ता. नगर) यांनी शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीची ही घटना बुधवारी (दि. २४) दुपारी ३.३० ते ४च्या सुमारास देहरे शिवारात असलेल्या घोगरदरा वस्तीवर घडली.

फिर्यादी काळे व त्यांचे कुटुंबीय घराला कुलूप लावून शेतात गवत काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी एका दुचाकीवर तिघेजण त्यांच्या वस्तीवर आले. त्यांनी घराचे कुलूप तोडून घरात घुसून घरातून सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ५० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी शेतात पिके जोमात असल्याने शेतकरी अंतर मशागत करण्यासाठी महागडे खते, फवारणीसाठी औषधासाठी थोडेफार पैसे घरात ठेवीत असल्याने भामटे त्याच्यावर डल्ला मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप शेतीतून काहीच उत्पन्न मिळालेले नाही मात्र शेतीसाठी आणलेले पैसे चोरटे घेऊन पसार होत आहेत. पर्यायाने आता शेतातील कामे करावीत कि घराला राखण बसावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Ahmednagarlive24 Office