अहमदनगर बातम्या

शेतकऱ्याच बैलावर प्रेम ! लाडक्या ‘माऊली’ च्या कानात घातली चक्क तोळ्याची सोन्याची बाळी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेतकरी म्हटले की शेती सॊबत जनावरे त्यात बैलांवर त्याचा विशेष जीव असतो. मात्र सध्या यांत्रिक युगात शेतीच्या कामातून बैल बाजूला झाले असले तरी शर्यतीसाठी बैलांचा वापर अलीकडच्या काळात वाढला आहे. दिवसेंदिवस शर्यतीचे वेड वाढत चालल्याने अनेक श्रीमंत शेतकरी या वेडासाठी बैल पाळतात.

राज्याच्या ग्रामीण भागात आज देखील अनेकांना बैलगाडा शर्यतीचे वेड आहे. तसाही महाराष्ट्राचा हा जुना व पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. खास या बैलगाडा शर्यतीसाठी अनेकजण जातवान बैल पाळतात. त्यांना केवळ बैलगाडा शर्यतीत पळवले जाते.

शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नवनाथ सखाराम आहेर या शेतकऱ्याने बैलाच्या प्रेमापोटी बैल पोळ्याच्या दिवशी त्याच्या ‘माऊली’ नावाच्या बैलाच्या कानात ७५ हजार रुपयांची एक तोळ्याची सोन्याची बाळी घातली.

आहेर यांना देखील मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचे वेड आहे. जिथे कुठे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते, तिथे आहेर यांची उपस्थिती असतेच. दिवसेंदिवस आहेर यांचे बैलगाडी शर्यतीवर विशेष प्रेम वाढत गेले आणि मागच्या वर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथून आहेर यांनी एक गोऱ्हा खरेदी केला. एकादशीला त्याची खरेदी केल्याने त्याचे नाव ‘माऊली’ ठेवण्यात आले.

आहेर पोटच्या लेकराप्रमाणे त्याचा सांभाळ करत आहेत. सध्या एकोणीस महिन्यांच्या ‘माऊली’ला दररोज पाच लिटर दूध दिले जाते. आता ‘माऊली’ शर्यतीत देखील सहभागी होऊ लागलाआहे . अत्यंत राजबिंडा, चकाकी आणि चपळाई असलेला क्षणार्धात कोणाचेही लक्ष वेधून चटकन आकर्षित करतो आहे.

त्याने आतापर्यंत विविध शर्यतीत बक्षिसे मिळवून नावलौकिक मिळवून दिला आहे. त्यामुळे खास बैलपोळ्यानिमित्त ‘माऊली’ला अनोखी भेट देण्याचे आहेर कुटुंबियांनी ठरवले. एक तोळा वजनाची सोन्याची कानातील बाळी केली आहे.

Ahmednagarlive24 Office